नारायणगाव : ( प्रतिनिधी ) नारायणगाव येथील खेबडे वडापाव पासून ते डॉ. खैरे हॉस्पिटल पर्यंत रस्त्याचा कामाचा शुभारंभ होऊन दीड वर्षापेक्षा अधिकच काळ लोटला आहे. परंतु काम काही पूर्ण होईना. काम अपूर्ण राहिल्यामुळे व रस्त्यात अनेक खड्डे पडून त्यात पाणी साठल्याने पाण्याची तळी साठली असून चिखलयुक्त पाणी लोकांच्या अंगावर उडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून राहिलेले सिमेंट काँक्रेट चे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. दरम्यान रस्त्याच्या कामाला विलंब होतोय ही वस्तुस्थिती खरी आहे. तथापि किमान ठेकेदारांनी ज्या ठिकाणी खड्डे पडले ते खड्डे तातडीने बुजवावेत अशा सूचना नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी संबंधित ठेकेदारांना केली आहे. खैरे हॉस्पिटल ते खेबडे वडापाव सेंटर इथपर्यंत असणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन दीड वर्षांपूर्वी तत्कालीन सार्वजनिक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तसेच तत्कालीन आमदार अतुल बेनके,भाजपा नेत्या आशाताई बुचके,भाजपाचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांच्या उपस्थितीत पार पडला होते. परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याने हे काम गेले अनेक दिवस रेंगाळलेले आहे. ठेकेदाराने बस स्थानक समोरून गटर पाईपलाईनचे काम पूर्ण केले आहे. तथापि उर्वरित काम अपूर्ण असल्याने व रस्त्यात खड्डे पडल्याने आणि सध्या पडत असलेल्या पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत असल्याने चिखलाचे पाणी रस्त्याने ये -जा करणाऱ्या पादुचारांच्या अंगावर उडत आहे. तसेच काही वेळेला दुचाकी वाहनांचा अपघात देखील होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने किमान या रस्त्याचे खड्डे तात्काळ ठेकेदाराकडून बुजवून घ्यावेत अशी मागणी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी केली आहे. या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केशव जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम लवकरच सुरू केले जाणार आहे. थोडी पैशांची देखील अडचण आहे. असे असतानाही ठेकेदाराला आपण ते काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खैरे हॉस्पिटल ते अदत्त मेडिकल पर्यंत निम्म्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम आठ दिवसांमध्ये सुरू होईल. तसेच हा रस्ता काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीला बंद ठेवण्यात येणार आहे नारायणगावच्या नागरिकांनी या बाबत सहकार्य करावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे.