नारायणगाव : (प्रतिनिधी ) “बहुजन हिताय बहुजन सुखाय ” ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या ओतूर बस स्थानकाचे मोठी दुर्दशा झाली आहे. बस स्थानकाच्या पुढच्या बाजूला खड्डेस खड्डे तर स्थानकाच्या मागच्या बाजूला सांडपाण्याचा विळखा पडल्याने प्रवाशांना या बस स्थानकामध्ये लालपरीची वाट पाहण्यासाठी नाकाला रुमाल लावून बसावे लागत आहे. तसेच त्डासांचे यांचे आरोग्य देखील धोके देण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी व्यक्त केले आहे. नगर कल्याण महामार्गावर ओतूर या ठिकाणी असलेले बस स्थानक खड्ड्यामध्ये असल्याने व त्या ठिकाणचे पावसाचे पाणी काढून देण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन न झाल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याची डबकी साठत आहेत.. सध्या पडत असलेल्या पावसामुळे देखील या ठिकाणी पाण्याची डबकी तयार होऊ लागली आहे. तसेच बस स्थानकाच्या बाजूलाच सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. या सुलभ शौचालयाचे सांडपाणी उघड्यावरच सोडून दिले जात असल्यामुळे बस स्थानक परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलीआहे. पावसाळी वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी वाढली असून साथीचे रोग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.या बाबत ग्रामपंचायतीने वारंवार एसटी महामंडळाला पत्र व्यवहार केला परंतु अद्याप या संदर्भामध्ये कोणतीही उपाययोजना केली नसल्याची खंत सरपंच छाया डुंबरे व सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी व्यक्त केली.तानाजी तांबे म्हणाले की, या संदर्भात अनेकदा मी स्वतः नारायणगाव डेपोचे मॅनेजर वसंत आरगडे यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. अधिकारी येतात पाहणी करतात पावसाळ्यामध्ये खड्डे पडल्यावर ग्रामपंचायत अथवा संबंधित विभाग तात्पुरते खड्डे बुजवतात. परंतु जास्त पाऊस झाल्यावर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष पाचवीलाच पुजला आहे.जास्तीचा पाऊस आला का या खड्ड्यामध्ये पुन्हा चिखल होतो, पाणी साठते आणि प्रवाशांच्या अंगावर हे चिखल युक्त पाणी उडते. तसेच बाजूच्या खड्ड्यामध्ये पाणी साठून राहिल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात निर्माण होते.त्यामुळे डासांचे प्रमाण वाढू लागल्याने प्रवासी व परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात डेपो मॅनेजर वसंत रगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, सुलभ शौचालयाचे सांडपाणी बस स्थानकाच्या मागच्या बाजूला उघड्यावर सोडले जात असल्याने दुर्गंधीचा प्रवासी व आजूबाजूच्या दुकानदारांना याचा त्रास होतोय तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होतोय ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आम्ही हे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनला जोडण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्यामुळे हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. शनिवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता ओतूर बस स्थानकाला मी भेट देणार असून ओतूरच्या सरपंच छाया डुंबरे यांच्याशी विचार विनिमय करून बस स्थानकातील शौचालयाचे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या ड्रेनेज लाईन ना जोडण्याबाबत चर्चा करणार आहे. त्यामुळे यावर तोडगा निघेल अशी मला आशा आहे. दरम्यान या संदर्भात सरपंच छाया डुंबरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, एसटी महामंडळाचे अधिकारी बस स्थानकाच्या परिसरातील बाबत अजिबात काळजी घेत नाही. बस स्थानकाच्या आवारात बांधलेल्या शौचालयाचे पाणी उघड्यावर सोडले जात असल्यामुळे स्थानकाच्या मागच्या बाजूला दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साठले आहे. तसेच पाऊस पडल्यावर हे पाणी परिसरामध्ये पांगत असल्याने बस स्थानकातील प्रवासी कर्मचारी व ओतूर बस स्थानकाचे आजूबाजूचे असणारे दुकानदार यांचे आरोग्य देखील धोक्यात येत असते. आम्ही याबाबतचा पत्रव्यवहार केलेला आहे परंतु एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. भविष्यकाळात या सांडपाण्यामुळे बस स्थानक परिसरातील तसेच ओतूर शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले तर याला जबाबदार एसटी महामंडळाचे अधिकारी राहतील. आम्ही याबाबतची तक्रार एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहोत. डेपो मॅनेजर वसंत आरगडे शनिवारी यासंदर्भात ओतूरला येणार आहेत त्यामुळे या सांडपाण्या संदर्भात काय उपाययोजना करणार? याचा आम्ही त्यांना जाब विचार अससल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ओतूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक सखाराम मिलखे म्हणाले की,पावसाळ्यामध्ये बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते. डास वाढतात. त्यामुळे आमच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. तसेच सांडपाणी देखील बस स्थानकाच्या मागच्या बाजूला उघड्यावर असल्याने दुर्गंधीचा देखील प्रवासी आजूबाजूचे नागरिक यांनाही त्रास होत आहे. हे सांडपाणी ग्रामपंचायततीच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले जावे.