नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील येणेरे परिसरातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे वादळी पावसाने मोठे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी जुन्नर चे तहसीलदार सुनील शेळके व कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी पाहणी करून कामगार तलाठी व कृषी सहाय्यकांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. येणेरे परिसरामध्ये आंब्याच्या बागा अधिक प्रमाणात आहेत. गेले पंधरा दिवस सतत पडत असणाऱ्या पावसामुळे या पिकावर मोठा परिणाम झाला असून आंब्याची फळे खराब होऊ लागले आहेत. येणेरे परिसरातील शिवनेरी हापूस आंब्याला मोठी मागणी असते. परंतु पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आंब्याच्या फळाला काळे डाग पडले आहेत. व फळ खराब होऊ लागले आहे. तसेच या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कांदे शेतामध्ये झाकून ठेवलेले होते, परंतु जास्तीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके व कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी येणेरे परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचे झालेल्या नुकसानीचे तसेच पावसाने भिजलेल्या कांदा पिकाची ही पाहणी केली. स्थानिक शेतकरी व येणेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ, काले गावचे सरपंच कुलदीप नायकोडी,काटेडे गावचे सरपंच चंद्रशेखर चिलप,विठ्ठलवाडीचे उपसरपंच हनुमान घोगरे, सुशांत ढोले, संदीप ढोले यांनी परिसरामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती तहसीलदार सुनील शेळके यांना दिली. दरम्यान आज(दि. 28) दिवसभर देखील या परिसरामध्ये पाऊस पडला. भर पावसात नुकसानीची पाहणी या अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यासाठी गाव स्तरावर कामगार तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व सरपंच यांची संयुक्त समितीमार्फत पंचनामे करून ते नोटीस बोर्डवर सुद्धा प्रसिद्ध करावी. तसेच एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये असे आदेश तहसीलदार सुनील शेळके यांनी दिले आहेत. व ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे अन्यथा संबंधित विमा कंपन्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दिले. दरम्यान येणेरे गावचे आंब्याचे उत्पादक शेतकरी सौ .शारदा अरुण ढोले यांनी त्यांच्या आंब्याच्या विम्यासाठी विमा कंपनीकडे आठ हजार पाचशे रुपये भरले आहेत,परंतु विमा कंपनी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पंधरा दिवसानंतर येऊ असे त्यांच्या हेल्पलाइन वरून सांगत होते,याबाबत येणेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ यांनी तहसीलदार सुनील शेळके यांना माहिती दिली. शेळके यांनी लगेचच कंपनी प्रतिनिधीशी संपर्क करून या विषयास गांभीर्याने घेण्याचे सांगितले. आपण तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबतचा योग्य निर्णय घेतला नाही तर आपले कंपनीविरुद्ध वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवला जाईल असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लगेच येऊन पंचनामे करून घेतो असे कबूल केले. @ फोटो खालील ओळ – मान्सूनपूर्व पडत असलेल्या पावसामुळे येणारे परिसरामध्ये आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने तहसीलदार सुनील शेळके व कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी केली पाहणी. (छाया – सुरेश वाणी )