नारायणगाव (प्रतिनिधी ) पिंपळवंडी(ता.जुन्नर)येथे घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख रुपये रोख व दागिने असा ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि ३) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यालगत वसंत तुकाराम वाघ यांचे घर असून ते काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी शैला व मुलगा निखिल हे कांदे झाकण्यासाठी घराला कुलुप लावून घराच्या बाजूच्या असलेल्या शेतात गेले होते.याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप काढून घरामध्ये प्रवेश केला व कपाटामधील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र ९० हजार रुपये किमतीचे २ तोळे सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील पाने ९० हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट ९ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम कानातील सोन्याचे डूल, बाळी, चांदीच्या पट्टा व कमरपट्टा तसेच रोंख रक्कम १ लाख ६९ हजार असा एकूण ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
दरम्यान कांदे झाकून झाल्यावर साधारणता अर्धा ते पाऊणतासने निखिल वाघ व शैला वाघ हे दोघेजण घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले व घरातील कपाटामधील दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे दिसून आले.त्यानंतर काही वेळाने कुकडी कालव्याजवळ असलेल्या संतोष फुलसुंदर यांच्या शेतात दागिन्यांची रिकामी पाकिटे आढळून आली.त्यानंतर संतोष यांनी याबाबत निखिल वाघ यांना माहिती दिली
या बाबतची फिर्याद निखिल व वसंत वाघ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल केली असून घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अनिल पवार करत आहे. दरम्यान नागरिकांनी घरामध्ये दागिने व पैसे ठेवू नयेत. बँकेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवावेत. व स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केले आहे