आंबेगाव तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याचा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा प्रयत्न .

मंचर (प्रतिनिधी) आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करून लोकांना पाणी देण्याच्या नियोजनाबाबत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वेळ, घोड व भीमा खोऱ्याचा भूशास्त्रीय अभ्यास करून जुन्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण व नवीन जलस्त्रोतांचे मजबुतीकरण करून लोकांना पाणी देण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत डॉ. सुमन पांडे, डॉ. संजय पाटील, डॉ. पडघमकर यांनी या भागाचा अभ्यास करून सद्यस्थिती व सुचवलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर आदिवासी भाग, मधला भाग, पूर्व भाग व पाबळ परिसरातील भाग असे चार वेगवेगळे भाग करून त्याचा सविस्तर आढावा यावेळी मांडला. विहिरी, विंधन विहिरी, तळी, नाले, ओढे यांचा देखील त्यांनी यामध्ये अभ्यास केला. तसेच पाणलोट नकाशा तयार करून त्यावर उपाययोजना सुचवल्या.

यामध्ये जुन्या तलावांची दुरुस्ती शास्त्रीय पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. चौकट आराखडा पुढील पाच वर्षाचा केला जावा, ज्या ठिकाणी धरण नदी तलावांचे पाणी मिळत नाही त्या भागाला पाणी देण्याचे काम यातून करता आले पाहिजे. यासाठी शासनाचा जलसंधारण विभाग त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना देखील मदत करेल, अशी ग्वाही यावेळी दिली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रत्येक गावात पूर्वीपासूनची पाण्याची ठिकाणी आहेत, याचे बळकटीकरण केल्यास प्रत्येक गावाला पाणी मिळेल, यासाठी प्रत्येक गावाची गावनिहाय माहिती संकलित करा व नोंदी घ्या या कामांसाठी अटल भूजल, कृषी विभाग, नरेगा व जिल्हा नियोजन समिती यामधून निधी दिला जाईल. मे महिन्यात ही कामे सुरू झाली पाहिजेत असे नियोजन करा. असा आराखडा पूर्ण पुणे जिल्ह्याचा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी कृष्णा खरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुजाता हांडे, गौरव बोरकर, ‘नाम’ फाउंडेशन, पाणी फाउंडेशन व ज्ञानशक्ती विकासवाहिनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!