मंचर ( प्रतिनिधी)
डिंभे धरण शंभर टक्के भरलेले असूनही, जुन्नर तालुक्याच्या मार्गे हे पाणी बीड व उस्मानाबादकडे वळवण्यात आले आहे. हे करत असताना आंबेगाव तालुक्यातील पाण्याची तीव्र गरज पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहे. धरणाच्या छायेखाली असलेल्या आंबेगाव तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी थेंबाथेंबासाठी वणवण फिरावी लागत आहे.
या गंभीर पाणीवंचनेबाबत सत्यशोधक बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हरिश कानसकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांनी पुढीलप्रमाणे स्पष्ट भूमिका मांडली:
धरण आपल्या तालुक्यात, पण पाणी मात्र दुसऱ्यांना? आंबेगावच्या जनतेची ही अवस्था म्हणजे अन्याय आणि शासकीय धोरणातील असमतोलाचा कळस आहे. स्थानिक मंत्री, आमदार, व मोठे नेते हे सगळे या अन्यायाला कारणीभूत आहेत. त्यांचं मौन म्हणजे या पाणीवंचनेला समर्थनच आहे.
सत्यशोधक बहुजन आघाडी या अन्यायाविरोधात आवाज उठवत असून, तातडीने आंबेगाव तालुक्याला पाणी देण्यात यावं, अशी आम्ही शासनाकडे जोरदार मागणी करतो. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असेल.”
हा प्रश्न केवळ पाण्याचा नाही, तर जनतेच्या हक्काचा आहे. शासनाने आंबेगाव तालुक्यातील नागरिकांच्या पाण्याच्या हक्काची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा सत्यशोधक बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून निर्णायक लढा उभारेल. असा इशारा त्यांनी दिला आहे.