नारायणगाव :(प्रतिनिधी)
जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 2025- 26 चा गळीत हंगाम समाप्त झाला असून यंदाच्या गळीत हंगाम 167 दिवस सुरू राहिला असून कारखान्याने यंदाच्या वर्षी 9 लाख 3 हजार 711 मे. टन उसाचे गाळप केले असून 9 लाख 91 हजार 101 साखर पोती उत्पादित झाली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
ते म्हणाले की, यंदा विघ्नहर कारखाना तब्बल 167 दिवस चालला. यंदाच्या वर्षी शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण झाल्यामुळे 1 लाख 46 हजार मे. टन ऊस बाहेरच्या कारखान्याला देण्यात आला. विघ्नहर कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे यंदा ऊस तोडणी काही प्रमाणात उशिरा झाली. यामुळे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना मनस्ताप झाला. परंतु शेतकऱ्यांचे विघ्नहरवर असलेले प्रेम व आमच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समजून घेऊन सहकार्य केले. पुढील वर्षी सर्व उसाचे गाळप वेळेवर होईल. 2025-26 च्या कारखान्याकडे पुरेसा ऊस असला तरी गेट केन ऊस सुद्धा उपलब्ध केला जाईल असे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या मार्गदर्शक धोरणानुसार आम्ही संचालक मंडळ काम करीत असून कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा नेहमीच विचार केला जातो. खर्च वजा जाता उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा नेहमीचाच प्रयत्न राहिलेला आहे.
दरम्यान यंदाच्या वर्षीचा गळीत हंगाम उशिरापर्यंत चालला असून कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले,सचिव अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, इंजिनिअर बाळासाहेब शिंदे, चीफ केमिस्ट,सर्व कर्मचारी व ऊस तोडणी मजूर या सर्वांच्या सहकार्यामुळे गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व उसाची तोडणी देखील केली.
कारखान्याचे सभासद हे कारखान्याचे मालक असून आम्ही विश्वस्त मंडळी त्यांच्या विश्वासाला नेहमीच पात्र राहण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदाच्या वर्षी विघ्नहर कारखान्याची निवडणूक पार पडली. सभासदांनी आमच्यावर विश्वास व्यक्त करून कारखान्याची सत्ता एकहाती आमच्या हाती दिली आहे. सभासदांचा आमच्यावर असलेला विश्वास याचा मला नेहमीच अभिमान असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. तसेच मी व माझे संचालक मंडळ कारखान्याचे सभासद व ऊस यांच्या हिताला कदापी तडा जाऊ देणार नाही.