नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यातील काही दिवसांपासून चर्चेत असलेले वारूळवाडी दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असताना आज(दि. 16) अखेर साडेपाच वाजण्याच्या सुमारास या कार्यालयाचे उद्घाटन नाट्यमयरीत्या करण्यात आले. दरम्यान वारूळवाडी येथील कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व इतर सुमारे १५ पोलीसांचा फौजफाटा आल्याने तेथे आज (दि. 16) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान तणाव निर्माण झाला. त्यानंतर काही वेळातच उपविभाागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर उपस्थित झाले.
यावेळी वारूळवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ, उपसरपंच प्रकाश भालेकर, वरूण भुजबळ, विक्रांत भुजबळ, शशिकांत पारधी, नितीन भालेराव व इतर काही जणांनी हे कार्यालय खाजगी जागेमध्ये जाऊन देणार नाही अशी भूमिका घेतली. याच वेळी वारूळवाडी तेथे सुयोग साम्राज्य या बिल्डिंगच्या मालकीण योगिनी खैरे यांनी माझ्या मुलाच्या स्मरणार्थ मी तीन हजार स्क्वेअर फुट जागा दुय्यम निबंधक कार्यालयासाठी मोफत देत आहे, तर बिघडलं कुठं? यावेळी त्यांनी वरून भुजबळ व नारायणगावचे सरपंच विनायक भुजबळ यांच्याशी हुज्जत घातली व हे कार्यालय नारायणगावच्या सुयोग साम्राज्य बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं नाही तर मी येथे आत्मदहन करील असा इशारा दिला. यावेळी काही प्रमाणात त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी वारुळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, वरून भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांच्यासह माजी उपसरपंच जंगल कोल्हे, शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, योगेश तोडकर, अरविंद भुजबळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान हे कार्यालय नारायणगाव हद्दीत शेवंताई पेट्रोल पंपासमोर सुयोग साम्राज्य इमारतीमध्ये हलवले असून तेथे दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी कार्यालयाचे उद्घाटन नाट्यमय्यारीत्या उरकले. प्रकृती खालावली असे सांगत ते कार्यालयाच्या बाहेर पडल्या आणि थेट नारायणगाव येथील सुयोग साम्राज्य बिल्डिंग मध्ये जाऊन नवीन जागेत कार्यालयाचे उद्घाटन केले. दरम्यान त्यांची प्रकृती घालवल्यामुळे त्या दुपारी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतले होते. वारुळवाडी च्या कार्यालयामध्ये सकाळपासूनच हे कार्यालय हलवण्यासंदर्भात वारुळवाडीचे ग्रामस्थ अधिक संख्येने जमू लागल्याने दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला पत्र देऊन साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलीस संरक्षण मागवले होते. वारुळवाडीच्या कार्यालयात पोलीस पोचल्यावर वारुळवाडी चे नागरिक व पोलिसांमध्ये काही प्रमाणात चकमक झाली. आम्ही केवळ अर्चना पोकळे यांना संरक्षण द्यायला आलोय ऑफिस हलवण्यासाठी मदत करायला आलो नाही असे नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले. ही चर्चा सुरू असताना दुय्यम निबंधक अर्चना पोकळे एका खाजगी गाडीतून नारायणगाव येथील सुयोग साम्राज्य बिल्डिंग मध्ये पोहोचल्या व त्यांनी या ठिकाणच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. दरम्यान ते कार्यालय अचानक हलवल्याने वारूळवाडी गावच्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. यापुढे या संदर्भात आमची लढाई सुरूच राहील असे सरपंच विनायक भुजबळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे वारुळवाडी ग्रामपंचायत मध्ये दुय्यम निबंधक कार्यालय हलवण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश असतानाही हे कार्यालय अधिकाऱ्यांनी परस्पर हलवण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात दुय्यम निबंधक अर्चना पाकळे म्हणाल्या की, कार्यालय हलवण्यासंदर्भात मला वरिष्ठांचे आदेश होते त्यांच्या आदेशानुसार नारायणगाव येथील सुयोग साम्राज्य बिल्डिंगमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे माझे कर्तव्य आहे. आज सकाळपासून वारुळवाडीच्या कार्यालयामध्ये वारूळवाडीच्या स्थानिक ग्रामस्थांनी कार्यालय नारायणगाव येथे न हलवण्याबद्दल गर्दी केली होती यामध्ये माझी प्रकृती बिघडल्याने मी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. कार्यालयात स्थानिक नागरिकांची गर्दी झाल्याने नारायणगाव पोलीस ठाण्याला मी पत्र देऊन बंदोबस्त मागविला होता असे त्यांनी सांगितले.