उत्तम वायदंडे यांचे जुन्नर येथे उपोषण सुरू.

WhatsApp


नारायणगाव : ( प्रतिनिधी) पेमदरा (तालुका जुन्नर) येथील सत्यशोधक बहुजन आघाडी या संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तम देवराम वायदंडे यांनी जुन्नर पंचायत समिती, जुन्नर तहसील कार्यालय व पेमदरा ग्रामपंचायत यांच्या विरोधात अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे जुन्नर या ठिकाणी बुधवारपासून (दि. 30) त्यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबतचे लेखी निवेदन जुन्नर तहसील कार्यालय तसेच जुन्नर पंचायत समिती आणि पेमदरा ग्रामपंचायत यांना देण्यात आहे. याविषयी बोलताना उत्तम वायदंडे म्हणाले की, अनुसूचित जाती दलित वस्तीमध्ये अभ्यासिका लवकरात लवकर बसून कार्यान्वित करावी, अशी मागणी अनेक वर्षाची असून ही मागणी मार्गी लागत नाही. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या समाज मंदिर व दफनभूमीसाठी 40 गुंठे जागा मिळावी याबाबतची मागणी करूनही हा विषय मार्गी लागत नाही व ग्रामपंचायत या संदर्भामध्ये ग्रामसभेत ठराव करून देत नाही. आणे व पेमदरा ग्रामपंचायतच्या हद्दीत मधून मुरमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वायदंडे यांची आहे. ही बाब अनेकदा महसूल विभागाच्या निदर्शनास आणून देऊन देखील कारवाई होत नसल्याची त्यांची म्हणणे आहे. सन 2020 ते 2025 पर्यंत 13 वा वित्त आयोग 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग मंजूर रकमेतून झालेल्या खर्चाची चौकशी केली जावी. तसेच अनुसूचित जाती मातंग वस्ती आदिवासी ठाकर वस्ती कडे जाणारा रस्ता कागदोपत्री करण्यात आला आहे परंतु प्रत्यक्षात रस्ता झाला नाही. याबाबतची चौकशी व्हावी . पेमदरा ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा राहणीमान भत्ता वितरणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी. गावठाण ते खटकाळी नवीन पाणीपुरवठा योजना करण्यात आली परंतु ती प्रत्यक्ष नवीन न करता जुनीच दुरुस्त करून लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे याबाबतची चौकशी व्हावी. जुन्नर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी दहा ते पंधरा वर्षे जुन्नर तालुक्यातच आहेत त्यांची तालुक्याबाहेर बदली करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांनी 27 मे 2025 रोजी सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यालयातून हाकलून देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याचे वायदंडे यांचे म्हणणे आहे. दरम्यान या संदर्भात प्रेमदारा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांच्याशी भ्रमणध्वनी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, उत्तम वायदंडे यांना कार्यालयातून बाहेर काढले नाही. त्यांच्याकडून चुकीचा आरोप होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान या संदर्भात तहसील कार्यालयाची संपर्क साधला असता तहसीदार सुनील शेळके म्हणाले की,आणे व पेमदरा परिसरांमधून बेकायदा मुरमाचे उत्खनन होत नाही. ज्या लोकांनी परवाना काढला आहे त्यांच्याकडून मुरमाचे उत्खनन होत आहे. तसेच जर कोणी मुरमाची चोरी करत असेल तर त्या संदर्भात भरारी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच गटविकास अधिकारी प्रतीक चेन्नवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पेमदरा ग्रामपंचायत संदर्भात उत्तम वायदंडे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी समिती गठित केली असून पेमदरा ग्रामपंचायतच्या दप्तराची तपासणी करून त्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!