बटाटा वाहतूक करणाऱ्या मालट्रकला भीषण आग; सुमारे दहा लाखांचे नुकसान.

WhatsApp


नारायणगाव : विघ्नहर टाइम्स आग्रा येथून पुण्याकडे बटाट्याची वाहतूक करणाऱ्या मालट्रकला आज (रविवारी) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने ट्रकचा पुढील भाग आणि बटाट्याचा माल जळून खाक झाला. या आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना पुणे–नाशिक बायपास महामार्गावरील डिंभे डावा कालव्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चालक संतोष शर्मा हे आग्रा येथून सुमारे वीस टन बटाटा माल घेऊन पुण्याकडे निघाले होते. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ट्रकच्या पुढील भागातून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संभाव्य धोका ओळखून त्यांनी तातडीने ट्रक महामार्गाच्या कडेला उभी केली. काही क्षणांतच ट्रकच्या इंजिनच्या बाजूने आगीने पेट घेतला आणि आग वेगाने पसरू लागली. घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस अंमलदार गोविंद केंद्रे, अमोल मिडगुले, प्रथमेश खाडे तसेच आपदा मित्र सुशांत भुजबळ, पोलीस मित्र सुदीप आढाव, गौरव पाटे, पराग वामन, सुनील जाधव आणि सूरज विधाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्नर अग्निशमन दलाचे कर्मचारी संतोष रोकडे यांनीही मदतकार्य केले. अग्निशमन दल आणि मदत पथकाच्या प्रयत्नांमुळे ट्रकच्या मागील भागातील माल व वाहनाचे अधिक नुकसान होण्यापासून वाचले. मात्र ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. तसेच बटाट्याच्या अनेक गोण्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावरील वाहतूक काही काळ एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात

error: Content is protected !!