नारायणगावचे टोमॅटो मार्केट तेजीत. किलोला भाव मिळतोय 45 ते 50 रुपये.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी ) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. 20 किलो वजनाचे क्रेट 950 ते 1000 रुपयाला विक्री होत आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक 25 ते 35 हजार क्रेटची होत आहे. टोमॅटो खरेदीसाठी विविध राज्यांमधून या ठिकाणी व्यापारी आलेले आहेत. सध्या टोमॅटोला बाजारभाव वाढल्याने दररोजची करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. नारायणगावच्या मार्केटमध्ये जुन्नर तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यातून टोमॅटोची आवक अधिकची होत आहे. टोमॅटो एका किलोला 45 ते 50 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे सध्याची रोजची उलाढाल एक कोटी ते सव्वा कोटी रुपयांची होत आहे. शेतकरी 20 किलो वजनाचे टोमॅटोचे क्रेट विक्रीला आणीत आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो घेण्यासाठी मुंबई, गुजरात, दिल्ली हरियाणा,मध्यप्रदेश,जयपुर आदी राज्यातून व्यापारी दाखल झालेले आहेत. टोमॅटोला दोन दिवसापासून बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात मात्र टोमॅटोला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्याचा ‘अर्थकारण’ पूर्णपणे कोलमडून गेला असून टोमॅटो लागवडीसाठी केलेला सगळा खर्च वाया गेलेला आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात लागवड केलेली टोमॅटो मे महिन्यात अधिकच्या पडलेल्या पावसामुळे पिकावर विपरीत परिणाम होऊन विविध रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला. तसेच व्हायरस, तिरंगा, काळा चट्टा तसेच करपा मोठ्या प्रमाणात आल्याने टोमॅटो निम्म्याहून अधिक उत्पादन घटले. वाहतूक व तोडणी खर्च देखील शेतकऱ्यांच्या अंगावर आला. सध्या एप्रिल महिन्यात लागवड केलेली टोमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये विक्रीला येत आहेत. प्रामुख्याने गावठी टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळतोय त्याचबरोबर आर्यमान आणि मेघदूत या व्हरायटीला जास्त मागणी आहे. दरम्यान टोमॅटोला बाजार भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी टोमॅटो निवडून आणावीत जेणेकरून टोमॅटोला व्यापाऱ्यांकडून अधिकचा बाजारभाव मिळेल असे आवाहन बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी नारायणगावच्या मार्केटमध्ये अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. टोमॅटो विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीचे कर्मचारी सकाळी सहा वाजल्यापासून मार्केटयार्ड मध्ये हजर राहून टोमॅटो विक्रीची वाहने व्यवस्थित लावून घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे काम करीत असल्याचे सभापती संजय काळे व संचालक आरती वारुळे यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!