तरकारीचे बाजार पडले. उत्पादक अडचणीत तर ग्राहक खुशीत.

नारायणराव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यात यंदा तरकारी भाजीपाल्याबरोबरच नगदी पिकांनाही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला असताना बाजारात मिळणारे दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
विशेषतः टोमॅटो पिकाचा हंगाम यंदा पूर्णपणे वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सध्या टोमॅटोला २० किलो क्रेटमागे केवळ २०० ते ४०० रुपये इतकाच बाजारभाव मिळत आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि औषधांचा खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहत नसल्याची स्थिती आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामात टोमॅटोची शेती करावी की नाही, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. सततच्या तोट्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून शेती टिकवणेच कठीण होत असल्याची खंत ते व्यक्त करत आहेत.
एकूणच भाजीपाला आणि नगदी पिकांना मिळणारे घसरलेले दर पाहता शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!