नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पिंपळवंडी येथे अत्याचारानंतर हत्या झालेल्या चिमुकलीच्या पीडित कुटुंबाची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासन खंबीरपणे कुटुंबाच्या पाठीशी असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित बेनके, जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे, बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके, पिंपळवंडी सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ लेंडे आदी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर परिसरातील समस्या तसेच घटनेबाबतच्या भावना मांडल्या. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पालकमंत्री म्हणून या घटनेकडे माझे बारकाईने लक्ष आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी दररोज संपर्क साधून तपासाबाबत माहिती घेत आहे. ही घटना संपूर्ण समाजाला काळीमा फासणारी असून, एक आई म्हणून मलाही या घटनेचे अत्यंत दुःख झाले आहे. आरोपीला पकडण्यात पोलिसांना तातडीने यश आले असून, कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.”
पीडित कुटुंबाला शबरी योजनेतून घरकुल देण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मनोधैर्य योजनेअंतर्गत कुटुंबाच्या खात्यावर १० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपळवंडी येथील पीडित वस्तीमध्ये हायमास्ट दिवा बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. त्याबाबतही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
“भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, समाजानेही जागृत राहणे गरजेचे आहे. घटना घडल्यानंतर मला तातडीने पिंपळवंडी येथे येता आले नाही; मात्र संबंधित अधिकाऱ्यांशी दररोज संपर्क ठेवून तपासाची माहिती घेत होते आणि तपास वेगाने करण्याच्या सूचना देत होते,” असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.