नारायणगाव : (प्रतिनिधी)
ऊस गळतीचा हंगाम सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असतानाही पुणे जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखान्यांनी अद्याप पहिली उचल जाहीर केलेली नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील कारखान्यांनी हंगामाच्या सुरुवातीला ₹३५०० रुपये प्रति टन प्रथम उचल जाहीर करून ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा दिला असताना, पुणे जिल्हा मात्र या बाबतीत शांत आहे.
जिल्ह्यातील काही कारखाने गाळप व्यवस्थित सुरू झाल्याचा दावा करतात; परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
इतर जिल्ह्यांत ₹३५०० प्रति टन उचल, पण पुण्यात घोषणा नाही
मराठवाडा, सोलापूर, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी प्रति टन ₹३२०० ते ₹३५०० एवढी पहिली उचल दिली आहे.
मात्र पुणे जिल्ह्यातील कारखाने कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचा प्रश्न मागे?
सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. राजकारणी प्रचारात व्यस्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. इतर वेळी शेतकरी संघटना नेहमीच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळतात येथे मात्र साखरेच्या गोडीने ते शांत झालेत का असाही सवाल शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.