नारायणगाव : (प्रतिनिधी) शिवनेरीच्या पायथ्याशी पायरीजवळ गेले अनेक वर्षे आमच्या अनेक पिढ्या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची सेवा करीत त्यांना पाणी, चहा व लिंबू सरबत देण्याचे काम करतो. परंतु गेल्या सहा महिन्यापासून वन खात्याने आमच्या पोटावर पाय देऊन आम्हाला त्या ठिकाणी हाकलून दिले आहे.वन खात्याने आम्हाला शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी तात्पुरता स्वरूपाचा व्यवसाय करण्याची अनुमती द्यावी या मागणीसाठी कुसुरच्या ग्रामस्थांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ उपोषण आज पासून ( दि. 7) सुरू केले आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन मार्ग निघतो का? याबाबतच्या वरिष्ठ पातळीवर आम्ही प्रयत्न करू आपण आपले उपोषण थांबवावे अशी विनंती उपोषणकर्त्यांना वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी केली आहे. उपोषणकर्त्यांची सुकाणू समिती स्थापन करून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या बरोबर पुणे येथे मंगळवारी (दि. 8) बैठकीचे आयोजन केले आहे. दरम्यान शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी गेले अनर्क वर्षे तात्पुरता व्यवसाय करणाऱ्या या लोकांच्या जुन्नर येथे सुरू असलेल्या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे गाऱ्हाणे समजून घेऊन या उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, कुसुर गावचे हे व्यावसायिक गेले अनेक वर्ष या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा सरबत, चहा व पाणी विक्रीचा व्यवसाय करतात. या लोकांमुळे शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना देखील मदत होत असते. व मार्गदर्शन मिळत असते.शिवनेरी किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी अनाधिकृत बांधकाम करण्यावर कारवाई करावी असे शासनाचे आदेश निश्चित आहेत. परंतु या लोकांनी कुठेही अनाधिकृत बांधकाम अथवा पत्र्याचे शेड उभे केलेले नाही. ही कुसुरकर मंडळी गेले अनेक वर्ष व याच्या काही पिढ्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांची सेवा करत आहेत. व त्यांना चहापाणी लिंबू सरबत देऊन सहकार्य करतात. त्यांच्या रोजगारावर वन खात्याने अशा प्रकारे बंदी आणू नये. भाजपा नेते आशाताई बुचके यांच्या माध्यमातून या लोकांना शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळवून देऊ. अधिकाऱ्यांनी सुद्धा फार कागदी घोडे नाचू नये. स्थानिक लोकांना मदत होईल यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा यावेळी संतोष खैरे यांनी व्यक्त केले. दरम्यान पापा खोत, कुसूर सरपंच दत्तात्रय ताजणे, कुसुर चे माजी सरपंच समीर हुंडारे,बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश ताजणे, कुसुर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजू भगत, गोळेगाव उपसरपंच हर्षल जाधव आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे दरम्यान या संदर्भात वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी कोणालाहीअतिक्रमण व्यवसाय करण्यास बंदी असल्याने या आदेशाची अंमलबजावणी आम्ही करीत आहोत. यामध्ये व्यक्तिगत कोणाची आडवणूक करण्याचा आमचा हेतू नाही. मुख्य वनसंरक्षकआशिष ठाकरे यांच्या पुणे येथील कार्यालयात उपोषणकर्त्याचे शिष्टमंडळ यांच्या समवेत मंगळवारी (ता. 8) बैठकीचे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उपवनसंरक्षक प्रशांत खाडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये सकारात्मक मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील असे चव्हाण यांनी सांगितले.