आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार – जगन्नाथ शेवाळे

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी )
लोकसभा व विधानसभा या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढल्याने चांगले यश आल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुका देखील महाविकास आघाडी म्हणूनच लढवल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी पक्षाच्या मेळाव्यात दिली.

नारायणगाव या ठिकाणी शुक्रवारी (दि. 27) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम , अध्यक्ष विजय कोलते,युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, अनंतराव चौगुले, उपाध्यक्ष शरद लेंडे , तालुका अध्यक्ष तुषार थोरात, मोहित ढमाले, अंकुश आमले, वल्लभ शेळके,तालुका महिला अध्यक्ष चंदाताई गाडगे, युवती तालुकाध्यक्ष सोनल शेटे, सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण भाऊ मुळे, शेखर ढवळे, राजश्री बोरकर संजय गुंजाळ, रमेश मेहेत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जगन्नाथ शेवाळे म्हणाले की, राज्यातील व केंद्रातील सरकार फसवे आहे. जनतेची हे सरकार फसवणूक करीत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी मंडळींनी शेतकऱ्यांना कर्ज माफी करू असं सांगून मतं मिळवली आणि निवडणूक झाल्यावर मात्र कर्जमाफी बाबत महायुतीचा नेता यावर बोलत नाही. केंद्रातील सरकार हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी काही भरीव योजना राबवत नाही. जनतेचा केंद्र व राज्य सरकारकडून भ्रमनिरास झाला आहे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.
महाविकास आघाडी म्हणून एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाण्याचे ठरले असून याबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते लवकरच अधिकृत घोषणा करतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार असल्या तरी महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या केवळ अफवा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जुन्नर तालुक्याला युवकचा अध्यक्ष लवकरच निवडला जाईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.
या मेळाव्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष देवदत्त निकम, ज्येष्ठ नेते शरद लेंडे, अनंतराव चौगुले, पक्षाचेतालुका अध्यक्ष तुषार थोरात, महिला अध्यक्षा चंदा गाडगे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर जुन्नर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यात काही प्रमाणात मरगळ आल्याचे दिसून येत आहे. विधानसभेला आपण ज्यांना उमेदवारी दिली ते सत्यशील शेरकर पक्षाच्या कार्यक्रमाला सक्रिय दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. पक्ष संघटना मजबूत करायची असेल तर नेत्यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ देणे आवश्यक असल्याचे निकम यांनी सांगितले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन रमेश मेहेत्रे यांनी केले तर आभार सईद पटेल यांनी मानले.
चौकट
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे युवा नेते विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घेऊन विधानसभेची उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीच्या घटक पक्षासह सर्वांनीच मेहनत करून शेरकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मत मिळाली. निवडणुकीनंतर पक्षाच्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक बैठका झाल्या परंतु या बैठकीला सत्यशील शेरकर एकदाही उपस्थित राहिले नाही. एवढेच नाही तर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील जुन्नर तालुक्यामध्ये दोन तीन ठिकाणी दौरा केला असता या दौऱ्यात देखील शेरकर उपस्थित नव्हते. याविषयी माध्यम प्रतिनिधींनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की सध्या पांडुरंगाचा पालखी सोहळा सुरू असल्याने सत्यशील शेरकर पंढरपूरला गेले आहेत असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.

जाहिरात

error: Content is protected !!