जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा बोलबालाअनेक शाळांचे प्रवेश फुल्ल..!चिमुकले झळकले गावातील चौका चौकात..!

WhatsApp

पारगाव प्रतिनिधी – किशोर खुडे

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा बोलबाला आता वाढला आहे. विविध शाळांमधील अनेक विद्यार्थी विविध परिक्षांच्या माध्यमातून गुणवत्ता यादीत सरस ठरत आहेत.आता नवीन वर्षाचे इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थ्यांचे बहुतांशी शाळांचे प्रवेश आतापासूनच फुल्ल झाले आहेत.अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.लहान मोठ्या शाळांचे गावागावात, चौकात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे फ्लेक्स लागलेले दिसत आहेत.
गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी गुणवत्ता यादीत मोठी सरस कामगिरी केल्याचे चित्र दिसत आहे.शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागात देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढतच चालल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील पालकांचा देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्याकडेच कल असल्याचे दिसत आहे.परंतू तरी देखील गुणवत्तेत वाढ झाल्याने जिल्हा परिषद शाळां मधिल विद्यार्थी पटसंख्या आता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष परिश्रम घेताना दिसत आहेत.सध्या तालुक्याच्या पूर्व भागात सर्वच गावांमध्ये चौका चौकात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील चिमुकल्यांचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. त्या फ्लेक्सवर संबंधित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वैशिष्ट्ये, गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे झळकविण्यात आले आहेत.
गावागावातील चौकात लावलेल्या फ्लेक्स वर संबंधित शाळांच्या इमारतींची छायाचित्रे ,तसेच नवोदय, सैनिक स्कूल, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, सरस्वती अकॅडमी, मंथन, एन. एस.एस.ई हसतखेळत या परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे छापली आहेत.
सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात आंबेगाव तालुक्यातून ९ विद्यार्थी हे नवोदय प्रवेश पात्र ठरले.त्यापैकी पिंपळगाव शाळेतील ५ व साकोरेमळा शाळेतील ४ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधिलच विद्यार्थी पात्र ठरले.
चौकट – १ :शिंगवे गावातील साकोरेमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पटसंख्या १५८ होती. त्यापैकी तब्बल १०१ विद्यार्थी हे राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.साकोरे मळा शाळेत इयत्ता पहिलीसाठी ५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश पुर्ण झाले आहेत.त्यापैकी तब्बल ३५ विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आलेले आहेत. =बाबाजी गाढवे मुख्याध्यापक .जि . प. प्राथमिक शाळा – साकोरेमळा .
चौकट – २ – :शिक्षकांच्या कष्ट – पालकांची साथ -:जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक देखील आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कठोर परिश्रम घेताना दिसत आहेत. ज्यादा तासाचे नियोजन, विविध स्पर्धा परीक्षांची इयत्ता पहिली पासूनच ते तयारी करताना दिसत आहेत. विविध प्रकाशनांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून शिक्षक करुन घेत आहेत. ते शनिवार, रविवारी देखील सुट्टी घेत नाहीत. या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना पालकांची देखील चांगली साथ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!