वृत्त संकलन करण्यासाठी आलेल्या IBN लोकमत पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर हल्ला.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधीवर नारायणगाव येथील कोल्हेमळा येथे भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न आज (दि 2) झाला असून संबंधित पत्रकाराने नारायणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात लेखी अर्ज दिला आहे. बायोमेट्रिक कामगारांची नोंद करण्यासाठी कोल्हेमळा या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. लाभार्थींकडून भांडी व साहित्य देण्यासाठी एजंट पैसे घेतात अशा गेल्या काही दिवसापासून तक्रारी होत आहेत. यासंदर्भात संबंधित पत्रकाराने इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर दोन दिवसापूर्वी बातम्या केल्या आहेत. सोमवारी ( दि. 2) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नारायणगावच्या कोल्हेमळा या ठिकाणी कामगारांना साहित्याचे वाटप होणार असल्याने हे वृत्त संकलन करण्यासाठी सचिन तोडकर गेले होते. यावेळी काही लाभार्थी महिलांनी सांगितले की, आमच्याकडून जास्त पैसे घेतले जातात. हे वृत्त संकलित करीत असताना अचानकपणे सचिन तोडकर यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली. दरम्यान पत्रकार सचिन तोडकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा लेखी अर्ज दिला असून या अर्जामध्ये म्हटले आहे की, कामगार साहित्य वाटप नोंदणी संदर्भात भ्रष्टाचार होत असल्या बाबतच्या बातम्या दोन दिवसापासून मी करीत आहे. सोमवारी नारायणगाव जवळच्या कोल्हेमळा या ठिकाणी कामगारांना भांडी व साहित्य वाटप होणार असल्याची माहिती समजल्यावर बातमी करण्यासाठी गेलो होतो. यावेळी भ्रष्टाचार करणाऱ्या तथाकदीत एजंट यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला व माझ्या चारचाकी गाडीची पुढील काच देखील फोडली आहे. या अज्ञात एजंटाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी तोडकर यांनी अर्जात केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!