नारायणगाव : (प्रतिनिधी)
पिंपरी पेंढार गावच्या हद्दीतील गटवाडी येथील अमित कुटे यांच्या घरात भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील कपाटातील साडे सहा तोळे वजनाचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवार ( दि. 24 ) दुपारी दोन वाजन्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजतात ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी संदीप मोरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान दिवसाढवळ्या चोरी होऊ लागल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंपरी पेंढार येथील गटवाडीमध्ये अमित कुटे आपल्या वृद्ध आई- वडिलांसोबत राहतात. घरी पॅरेलेसीस झालेले वडील दत्तात्रय कुटे अंथरुणाला खेळून आहेत.आई वृद्ध वडिलांच्या सेवेसाठी घरीच असते. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा लोटून घेऊन बाजूला पावसाने उगलेले गवत आई काढीत होती. यावेळी तिघेजण दुचाकी वाहनावरून आले व दोघांनी घरात प्रवेश करून एक जण दरवाजावर पाळतीला उभा राहिला.दोघांनी घरातील दोन्ही कपाटे उचकटून त्यातील साडेसहा तोळे वजनाचे दागिने व एक हजार रुपये लंपास केले. व कपाटातील इतर साहित्य घरात फेकून दिले.
दरम्यान समोर राहत असलेल्या निखिल मस्करे युवकाने या तिघांची हालचाल संशयास्पद वाटली. त्याने घराशेजारी खुरपत असलेल्या आजीला तुमच्याकडे कोण पाहुणे आले होते का? असे विचारणा केली असता आजी नाही म्हणाल्या मग त्यांचा संशय अधिकच बळावला. घरात येऊन पाहतात तर कपाट उचकटून कपाटातील साडेसहा तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. हे तिघेजण चोरटे युनिकॉन दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट पसार झाल्याचे निखिल मस्करे यांनी पाहिले. या घटनेची माहिती तातडीने त्यांनी ओतूर पोलीस स्टेशनला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस तातडीने घटनास्थळी आले आजूबाजूचे कॅमेरे तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या अज्ञात चोरट्यांचा शोध लागला नाही.
दरम्यान याबाबतची फिर्याद अमित कुटे यांची पत्नी रत्ना कुटे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली आहे. अमित कुटे व त्यांची पत्नी रत्ना कुटे दोघेही दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. या चोरट्यांनी रेकी करून घरातील दागिन्यांवर डल्ला मारला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत.
दरम्यान तीन वर्षापासून पॅरेलेसिस झालेले पती दत्तात्रय कुटे यांची सुश्रुषा करण्यासाठी मिराबाई कुटे घरीच असतात. घरा शेजारचं गवत काढायला जात असताना त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र दरवाजाच्या बाजूला खुंटीला अडकून ठेवले होते. चोरट्यांच्या ते मंगळसूत्र निदर्शनात न आल्याने ते मात्र शाबूत राहिले.