नारायणगाव : (प्रतिनिधी) भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध म्हणून पिंपळवाडी येथे निवृत्ती लेंडे यांचे तीन दिवसापासून उपोषण सुरू सुरू असून आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांची जुन्नर तालुक्यात येऊन शेतकऱ्यांची माफी मागावी व आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी लेंडे यांची मागणी आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी उपोषण स्थळी भेट देऊन निवृत्ती लेंडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य करणे अयोग्य आहे जगाचा पोशिंदा आपण शेतकरी म्हणतो त्यांच्याबद्दल जर लोकप्रतिनिधी असे बेजबाबदार बोलत असतील तर त्या वक्तव्याचा निषेध करायला हवा. कृषिमंत्री माणिक कोकाटे हे देखील शेतकऱ्यांबद्दल वारंवार चुकीचे बोलत आहे त्यांचे वक्तव्य देखील निंदनीय आहे. लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो ते जर शेतकऱ्याबद्दल अपशब्द वापरणार असतील तर ही बाब समर्थनीय नाही. बेनके यांच्या समवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, पिंपळवंडी सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ लेंडे, काला बँकेचे संचालक संदीप लेंडे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ, डॉ.गणपत डुंबरे, शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू ढोमसे, अजित वाघ,शेतकरी संघटनेचे नेते तानाजी तांबे, संजय भुजबळ,सचिन थोरवे,तानाजी बेनके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद गंडे आदी उपस्थित होते. दरम्यान आमदार शरद सोनवणे सोनवणे यांनी निवृत्ती लेंडे यांच्याशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधून सध्या अधिवेशन सुरू असल्याने मी आपला विषय सभागृहात मांडतो असे सांगितले. तसेच आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांप्रती चुकीचं वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे सांगितले. दरम्यान माजी आमदार अतुल बेनके म्हणाले की, उपोषणाचा तिसरा दिवस असून निवृत्ती लेंडे यांची प्रकृती खालावत चालली असल्याने उपोषण स्थगित करून पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन व त्यांना संबंधित आमदाराला समज द्यायला सांगून शेतकऱ्यांची माफी मागायला लावू. तथापी निवृत्ती लेंडे यांनी उपोषण थांबवण्यास नकार दिला. जोपर्यत बबन लोणीकर जुन्नर तालुक्यामध्ये येऊन शेतकऱ्यांची माफी मागत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका जाहीर केली.