नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
अष्टविनायक दर्शन दौऱ्यादरम्यान शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणपतीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. मंदिराचा पुरातत्त्वीय व ऐतिहासिक वारसा जपत भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत ओझर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी केल्यानंतर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “पूर्वीच्या तुलनेत मंदिरातील अनेक कामे पूर्ण झालेली दिसत आहेत. मंदिराच्या आतील भागात मार्बलचा वापर केल्यामुळे तापमानात होणारा बदल आणि त्याचा मूर्तीवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. आता पुरातत्त्व विभागाच्या सूचनांनुसार काम करण्यात आल्याचे दिसत असून ही समाधानाची बाब आहे.” सुमारे १३ वर्षांपूर्वी मंदिर परिसराचे सुशोभीकरण करून जवळील येडगाव जलाशयात नौकाविहार सुरू करण्याची भूमिका मांडली होती. राज्य शासनाने आता येडगाव जलाशयात नौकाविहारास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेता येणार असून, परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे यांनी ११ ते १३ डिसेंबर २०२१ दरम्यान अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा दौरा केला होता. त्यानंतर १० जानेवारी २०२२ रोजी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासाबाबत विविध सूचना केल्या होत्या. रस्ते, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, दिशादर्शक फलक तसेच तलाव परिसराचे सुशोभीकरण ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. “आज यातील काही कामे प्रत्यक्षात पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिराचे पावित्र्य आणि ऐतिहासिक स्वरूप जपत भाविकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्याची शासनाची सकारात्मक भूमिका अभिनंदनीय आहे,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. यावेळी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे बाळकृष्ण कवडे, शिवसेना सचिव वैभव थोरात, सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, लातूर संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षा मोरे, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत आदी उपस्थित होते.