ओतूर : (प्रतिनिधी) ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत ओतूर शहरात दोन बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्यास असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेली असल्यामुळे दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस हवालदार शरद जाधव, ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक आमने, पोलीस हवालदार दिनेश साबळे, नामदेव बांबळे, महेश पठारे, संदीप लांडे, पालवे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोंबले, संतोष भोसले, किशोर बर्डे, ज्योतीराम पवार, विशाल गोडसे यांनी बुधवारी (दि.7)रोजी दुपारी 4.55 वाजण्याच्या सुमारास ओतूर जुन्या बस स्टँड जवळून सदर दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (1) भारतातील नाव- ताजमिर मुस्तफा अन्सारी, वय (28 वर्षे, राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. बांगलादेशातील नाव – मोहम्मद ताजमिर हुसेन मोहम्मद गुलाम मुस्तफा, राहणार बोईकारी, तालुका जिल्हा सातखिरा. )(2) भारतातील नाव- अलीमून गुलाम अन्सारी, (वय 27 वर्षे, रा. ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बांगलादेशातील नाव – आलिमून कादेर मोहम्मद गुलाम हुसेन, राहणार बोईकारी, तालुका जिल्हा सातखिरा)
त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे व भारतात घुसखोरी करून बेकादेशीररित्या राहत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघां बांगलादेशी नागरिकांकडे त्यांचे बांगलादेशी पासपोर्ट तसेच भारतातील आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आली आहेत.
ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोंबले यांच्या फिर्यादीवरून दोन बांगलादेशी नागरिकांवर परकीय नागरिक कायदा 1946 कलम 14, पारपत्र अधिनियम 1967 नियम 3 व 6, परकीय नागरिक आदेश 1950 चे कलम 3 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले.