नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोटार चोरी व केबल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत नारायणगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली मोटार व केबलसह सुमारे २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ व १९६/२०२६ या प्रकरणांचा समांतर तपास सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अशोक शांताराम केदार (वय ३५, रा. कवडेवस्ती, ओझर, ता. जुन्नर), आकाश विलास काळे (वय २२) व समीर संतोष पारधी (वय २५, दोघेही रा. नंबरवाडी,( वारुळवाडी, ता. जुन्नर )यांचा समावेश आहे.
आरोपींकडून चोरीस गेलेली मोटार व मोटारींचे केबल साहित्य जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत २१ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींना मध्यवर्ती कारागृह, येरवडा येथे रवानगी करण्यात आली आहे.
या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार तावजी दाते व पोलीस हवालदार मगनलाल भुसावरे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुबम कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
याकामी हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ डोके व पोलीस कॉन्स्टेबल दिनेश जाधव यांची मदत झाली.