नारायणगाव : (प्रतिनिधी) वाढत्या पर्यावरणाचा ऱ्हास पाहता वृक्षारोपणाची सर्वत्र गरज आहे या अनुषंगाने नारायणगाव येथील गणपीर बाबा डोंगरावर सीडबॉल पेरणी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नारायणगावचे उप सरपंच बाबू पाटे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत नारायणगाव, इनरव्हील क्लब नारायणगाव, यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हे मळा येथील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारच्या झाडांचे बिया, बियांपासून बनवलेले सीडबॉल पेरणी व वृक्षारोपण शाळेतील विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले . यावेळी उप सरपंच पाटे म्हणाले की, निसर्गाचा समतोल बिघडू नये यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संगोपन करण्याची आवड शालेय जीवनात निर्माण होण्यासाठी, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रकारे समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी इनरव्हील क्लबचे अध्यक्ष समृद्धी वाजगे तसेच पदाधिकारी अंजली खैरे प्राथमिक शाळेचे शिक्षिका सौ. तोडकर , हेमंत कोल्हे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी उपसरपंच संतोष वाजगे, माजी उपसरपंच आरिफ आतार, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, ग्रामपंचायत सदस्य, गणेश पाटे,नंदू अडसरे, बाळा वाव्हळ, संतोष दांगट, ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक व इनरव्हील क्लबचे सदस्य उपस्थित होते.