नारायणगाव – वारूळवाडी परिसरात दिवसा चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले. अज्ञात चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून 7 लाख 74 हजार रुपये किमतीच्या ऐवज केला लंपास.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव व वारूळवाडी हद्दीतील तीन बंद फ्लॅटचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा तोडून 15 तोळे सोन्याच्या दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकुण 7 लाख 74 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही चोरीच्या घटना 10 जुलै 2025 रोजी दुपारी अकरा ते एक वाजण्याच्या सुमारास झाल्या आहेत. नारायणगाव, वारुळवाडी परिसरामध्ये चोऱ्या वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास करून चोरट्यांचा छडा लावावा. आमचा ऐवज परत करावा.अशी मागणी नारायणगाव व वारुळवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी 10 जुलै 2025 रोजी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेटेमळा येथील ओंकार हाईटस मधील राजेंद्र अडसरे यांच्या बंद फलॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाचा लॉकर तोडून तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर कोल्हे मळा येथील आराध्य हाईटस मधील उषा धादवड यांच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन कपाटात असलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागीने लंपास केले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील साने वस्ती येथील सौ.नीता शेळके यांच्या कमल प्लाझा सोसायटीमधील फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. तसेच त्याच सोसायटीतील वरच्या मजल्यावरील एक फ्लॅट चोरट्यांनी फोडला परंतु कपाटात काही पैसे नसल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. एकाच दिवशीतीन सदनिकेमधील सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकुण 7 लाख 74 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यानी लुटून नेला आहे. यापूर्वीही या भागात बंद फ्लॅटमध्ये चोरीच्या घटना झाल्या आहेत. मात्र या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. नोकरीनिमित्त फ्लॅट बंद करून गेल्यानंतर चोरटे आपला डाव साधत आहेत.सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, सुरक्षारक्षकाची नेमणूक करा, संशयित व्यक्तींची माहिती पोलीस ठाण्यात द्या.असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान या तीनही चोऱ्या एकाच टोळीने केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर म्हणाले की,दरम्यान जुन्नर तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले असून स्थानिक नागरिकांनी ग्राम सुरक्षा पथक तसेच गृह सोसायटीत राहत असलेल्या लोकांनी देखील आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे जेणेकरून दिवसाढवळ्या बंद फ्लॅट चोरट्यांकडून कुठले जाणार नाहीत. ग्रो सोसायटीत सुद्धा दिवस पाळीला वॉचमन ठेवणे अपेक्षित आहे व सोसायटीत येजा करणाऱ्या लोकांची नोंदवही ठेवणे अपेक्षित आहे. तसेच सोसायटीच्या आवारात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश दिला जाऊ नये. आणि फिरते विक्रेते यांना देखील सोसायटी परिसरात फिरकू देऊ नये. एखादा व्यक्ती विषयी संशय वाटला तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा.

जाहिरात

error: Content is protected !!