नारायणगाव ( प्रतिनिधी ) येथील पुणे – नाशिक महामार्गालगत असलेल्या सुमारे ऐंशी वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमुळे झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्थानिक व्यक्तींनेच ही आग लावली असल्याची परिसरात चर्चा आहे.
नारायणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी,आपदा मित्र, ग्राम सुरक्षा दलाचे जवान, स्थानिक रहिवासी यांनी जीव धोक्यात घालून पाणी मारून आग विझवली.
या भागात वडाच्या दोन झाडांना मागील वर्षी एप्रिल पाहिल्यात आग लावली होती. वनविभाग व नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवल्याने त्या झाडांना जीवदान मिळाले होते. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वटवृक्षाला आग लावणाऱ्याचा व्यक्तीचा शोध राष्ट्रीय महामार्ग विभाग, नारायणगाव पोलीस स्टेशन व वन विभागाने घेऊन कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आज पहाटे दोन वाजताच्या सुमारास कलासागर मंगल कार्यालयासमोरील येथील महामार्गालगतच्या
भव्य वटवृक्षाला आग लागल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी तातडीने
नारायणगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मंगेश लोखंडे,आपदा मित्र सुशांत भुजबळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाणी मारून त्यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत झाडाचे जळून पन्नास टक्या पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
महामार्ग लगती झाडे जाळून नष्ट करणाऱ्या व वटवृक्षाची कत्तल करणाऱ्या व्यक्तीचा नारायणगाव पोलिसांनी शोध घ्यावा, वृक्षसंपदा वाचवावी अशी मागणी नारायणगाव व वारूळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
