नारायणगाव : ( प्रतिनिधी ) उत्तर पुणे जिल्ह्यात अतिशय जागृत असलेल्या मुक्ताबाई व काळोबा देवाची यात्रा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्याबद्दल आणि नारायणगाव पोलिसांनी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवल्याबद्दल नारायणगावातील ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करून आभार मानले.
.यात्रा कमिटी व नारायणगाव पोलीस ठाणे यांच्या समन्वयाने उत्कृष्ट बंदोबस्त ठेवण्यात आला. या दरम्यान महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका, रात्रीचे तमाशा कार्यक्रम, कुस्त्यांचे आखाडे व पाळणा परिसरातील विविध उपक्रम अत्यंत शांततेत व सुरळीत पार पडले. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने चार पोलीस अधिकारी 17 महिला कर्मचारी व इतर पुरुष पोलीस कर्मचारी असा एकूण 40 जणांचा बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे मंदिरामध्ये मुक्ताई देवीच्या अंगावर सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात घातले असल्याने त्या ठिकाणी 24 तास बंदोबस्त यात्रा काळात ठेवण्यात आला होता.
यात्रा काळात वाहतूक नियमन, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच सुरक्षा व्यवस्थापन यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. मुक्ताई माता मंदिरात परिधान होणाऱ्या अंदाजे १३० तोळे सोन्याच्या दागिन्यांचे व चांदीच्या अलंकारांचे संरक्षण तसेच भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त २४ तास कार्यरत होता. भुरट्या चोऱ्या टाळण्यासाठी सलग ८ दिवस रात्रंदिवस पोलीस पेट्रोलिंग व वाहतूक नियंत्रण कार्यवाही प्रभावीपणे राबवली गेली.
यात्रेचा संपूर्ण कालावधी कोणत्याही कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटनेविना पार पडला. त्यामुळे नारायणगाव व परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिकांनी नारायणगाव पोलीस स्टेशन व यात्रा कमिटीचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने केलेले उत्कृष्ट कार्य कौतुकास्पद असून, ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली, याचा सर्वत्र गौरव होत आहे. मुक्ताबाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबू पाटे व मुक्ताई समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खैरे म्हणाले की, यंदाच्या वर्षी नारायणगावच्या यात्रेला लाखो भाविक आले होते. तसेच तमाशाला देखील मोठी गर्दी होती. यात्रेमध्ये दाखल झालेल्या विविध प्रकारचे पाळणे व विविध खेळ पाहण्यासाठी लाखो लोक येत होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याबाबतची नारायणगाव पोलीस स्टेशनने विशेष काळजी घेतल्याने ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडली . पोलीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल यात्रा कमिटी व नारायणगावकर निश्चित त्यांचे आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.