नारायणगाव : वृत्तसेवा
वारुळवाडी ते गुंजाळवाडी रस्त्यावर घोडेवाले पवार यांच्या घराजवळ पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून २० वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुणाचा मित्रही जखमी झाला असून, त्याच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा आणि तीन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत राजेश गाडेकर (वय २०, रा. हनुमान चौक, नारायणगाव) हा मित्र निशाद दांगट याच्यासोबत त्याच्या आजोबांच्या घरी वारुळवाडी येथे जेवणासाठी दुचाकीवरून जात होता. वारुळवाडी गावच्या हद्दीत घोडेवाले पवार यांच्या घरासमोर पाठीमागून आलेल्या पाच जणांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्यांना अडवले.
त्यानंतर आरोपींनी संगनमताने वेदांत याच्या डाव्या डोळ्याजवळ, गालावर आणि पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच त्याचा मित्र निशाद दांगट यालाही मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. या मारहाणीत वेदांत याच्या डाव्या डोळ्याजवळ व गालाच्या हाडावर गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.