नारायणगाव: (प्रतिनिधी).पोलिस दलाचा लौकिक, गौरव वाढेल असे चांगले काम करा.चुकीच्या प्रवृत्तींना डोके वर काढून देऊ नका. पोलिस दलाचा कारभार महायुती सरकारची प्रतिमा उंचावणारा असावा. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी नऊ वाजता झाले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. विकास कामांसाठी 36 जिल्ह्यातील जिल्हा नियोजन मंडळाला( डीपीसी) 21 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.या पैकी 600 कोटी रुपये पोलीस दलाच्या सुसज्यतेसाठी दिले आहेत. या निधीचा वापर सायबर क्राईमचा छडा लावण्यासाठी,अँटी-ड्रोन गन,सीसीटीव्ही कॅमेरे आदीसाठी किंवा आवश्यक त्या बाबींसाठी खर्च करून कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील पोलीस दलासाठी डीपीसीला 42 कोटी रुपयांचा निधी दिला, असल्याचा आवर्जून उल्लेख पवार यांनी केला. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, भाजप नेत्या आशा बुचके आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यात 77 हजार कोटी रुपयांचा सायबर क्राईम झाला आहे. या संदर्भात शासनाकडून उपाययोजना सुरू केल्या आहेत. महायुती सरकारने वीजटांचाई दूर करण्यासाठी 9 हजार 500 मेगावॅट प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा निर्णय केला घेतला आहे. शासकीय कार्यालयासाठी नवीन इमारतीची बांधकामे सुरू केले आहेत.मात्र ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत असा माझा कटाक्ष आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्व क्षेत्रात सुरू आहे.कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या माध्यमातून खते, पाणी आदीची बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दीडपट वाढ करण्याचा उद्देश आहे.राज्यातील कारखान्यांना ऊस कमी पडू लागला आहे. देशासाठी शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबांच्या मदतीत एक कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सन 2029 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा सदस्यांच्या जागेत वाढ होणार असून 96 महिलांना विधानसभेची संधी मिळणार आहे. या माध्यमातून माझ्या लाडक्या बहिणींना संधी मिळणार नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल म्हणाले येथील पोलीस ठाण्यासाठी आता सुसज्ज इमारत झाली आहे. तालुक्यातील शंभर पोलीस व 10 अधिकारी यांना राहण्यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात अद्यावत इमारतीचे बांधकाम करावे. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी या वेळी गिल्ल यांनी केली. कार्यक्रमाची नियोजन सहाय्य पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी आठ वाजताच नारायणगाव या ठिकाणी दाखल झाले. नारायणगाव चा कार्यक्रम उरकून त्यांनी बोरी येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन केले त्यानंतर त्यांनी ओतूर येथील सद्गुरु तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला भेट दिली. या दौऱ्या दरम्यान ठीक ठिकाणी अजित पवारांच्या ताफा थांबवून कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. तथापि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे मात्र या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. नारायणगाव येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सांगितले की शरद सोनवणे म्हणतात मला प्रशासन विश्वासात घेत नाही मी नाराज आहे. महायुतीचे सरकार असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात आ.शरद सोनवणे सहभागी न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.