नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव व जुन्नर येथे घरफोडीचे करून फरार झालेल्या चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. आरोपीकडून तीन घरफोडी मधील १६ तोळे वजनाचे सोन्याचे, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकल, असा एकूण सुमारे १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी विशाल दत्तात्रय तांदळे( वय २८ सध्या रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे मुळ रा. पाटेगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर ) याला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी: पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू भागूजी सांगडे (वय ६२ वर्षे रा. वैभवलक्ष्मी सोसा विटेमळा नारायणगाव ता. जुन्नर ) यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने बँकेत ठेवलेले दागिने घरी आणून कपाटात ठेवले होते.14 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते कुटुंबासह नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताबाई देवीच्या काकड आरती साठी गेले होते. दरम्यानच्या काळात आरोपीने कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातून सोने,चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथक करत होते. चोरी केल्यानंतर आरोपी मोटर सायकल वर पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्पन्न झाले होते. त्या आधारे तांदळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने नारायणगाव येथे जुन्नर परिसरात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपीकडून तीन घरफोड्या मधील १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे, महोदव शेलार, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, सोमश्वर शेटे,मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, निलेश जाधव यांच्या पथकाने केली.