नारायणगाव ( प्रतिनिधी) उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून राग मनात धरून मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याची लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापैकी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. दरम्यान अटक आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
ओम सुखदेव बर्डे, कुणाल चंद्रकांत कानडे(राहणार नारायणगाव, ता. जुन्नर) यांना अटक केली असून त्यांचा सहकारी इतर एक आरोपी फरार झाला आहे. उधारीवर सिगरेट देत नाही म्हणून 20 जुलै 2025 रोजी आरोपीं शेवंताई सीएनजी पंपा जवळ असलेल्या आकाश पान शॉप या टपरी चालकाला शिवीगाळ करत होते. यावेळी सुशांत शांताराम आमले याने भांडण कशाला करता असा जाब आरोपींना विचारला. या कारणावरून आरोपींनी सुशांत आमले याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून मोटरसायकल वरून खाली पाडले. शर्टाचे बटन तोडून आमले यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची चैन, शर्टाच्या वरच्या खिशात असलेले साडेसात हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नारायणगाव पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.