नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील धन मेथी मार्केटमध्ये पावसाळ्यात हा भाजपाला भिजत असल्याने शेतकऱ्यांना प्लास्टिकचा कागद आणून त्याच्यावर कोथंबीर व मेथी टाकून झाकून ठेवावी लागत आहे. तसेच पावसाळी वातावरण असल्यामुळे चिखल व माती मार्केट कमिटीच्या आवारात येत असल्याने परिसरामध्ये अधिक चिखल होत असून यामुळे व्यापारी व शेतकरी यांची कुचुंबना होत आहे. यामुळे धना मेथीच्या बाजारभावावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे.
दरम्यान जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव येथे नवीन खरेदी केलेल्या जागेत लवकरच मोठे पत्र्याचे शेड बांधून त्या ठिकाणी धना मेथी लिलाव करण्यात येणार असल्याचे सभापती संजय काळे यांनी सांगितले. व शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी कोथंबीर, मेथी व शेपू यांचा दररोज सायंकाळी सात वाजता लिलाव होत असतो. मार्केट कमिटीच्या या जागेमध्ये संपूर्ण सिमेंट काँक्रीट केले आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे शेतामधून धना व मेथी काढल्यावर अधिकचा चिखल या ठिकाणी येत असल्याने शेतकऱ्यांना प्लास्टिकचा कागद टाकून त्यावर कोथंबीर, मेथी व शेपू ठेवावी लागत आहे. तसेच पाऊस आल्यावर त्यावर प्लास्टिकचा कागद देखील शेतकऱ्यालाच टाकावा लागत आहे. बाजार समितीच्या आवारामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कोथिंबीर व मेथी टाकून तेथेही लिलाव घेतला जातो. परंतु जागा कमी पडत असल्यामुळे उघड्या मैदानात लिलाव घ्यावा लागतो. व त्या ठिकाणी झालेल्या चिखलामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान बाजार समितीने पुणे – नाशिक महामार्गावर मारुती शोरूमच्या बाजूला 13 एकर जागा खरेदी केली असून त्या ठिकाणी पत्रा शेड बांधून लवकरच कोथिंबीर व मेथी लिलाव तिकडे हलवण्यात येणार असल्याचे सभापती संजय काळे यांनी सांगितले.