नारायणगाव:(प्रतिनिधी)
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सन 2023 – 24 मध्ये घेतलेल्या फळबागा उत्पादन पदविका परीक्षेमध्ये नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील सुरेखा रंगनाथ पवार यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला.
त्यांचा सोमवारी (ता. 30) विद्यापीठाच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑडिटोरियम हॉलमध्ये पारितोषिक वितरण समारंभात डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक, रु. 2000 चा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भट्टूप्रसाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विद्यापीठाच्या सर्व शाखांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
सुरेखा पवार नारायणगाव मुक्त कृषी शिक्षण केंद्राच्या अभ्यासू विद्यार्थिनी असून त्यांनी आपल्या या ज्ञानाचा व अनुभवाचा प्रत्यक्ष वापर आपल्या शेतीमध्ये केला आहे. कोणतीही नोकरी न करता आपल्या काळ्या आईची सेवा करण्याचा त्यांचा ध्यास आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे गावी त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये आणि बांधावरसुद्धा केशर व हापूस आंब्याची झाडे लावून शेतीचे नंदनवन केले आहे. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशात पती यशवंत काळे यांचा सिंहाचा वाटा आहे, असे ते आवर्जून नमूद करतात. व्यावसायिक विभागाचे प्रमुख डॉ. सत्यवान थोरात यांनी सुरेखा पवार यांना मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख डॉ. मिलिंद भुजबळ, केंद्र संयोजक प्रा. राधाकृष्ण गायकवाड व सर्व मार्गदर्शक तज्ज्ञांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.