नारायणगाव: ( प्रतिनिधी )केंद्रीय कृषि आणि किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात दिनांक २९ मे ते १२ जुन २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ सुरवात आज जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी, येडगाव, नारायणगाव, पिंपळवंडी, कालवाडी, उंब्रज या गावांमधून मोठ्या उत्साहात झाली. ‘संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या महत्वाकांक्षी अभियानात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञानी खरीप हंगामातील नियोजन, पिकांचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सोयाबीन बीज प्रक्रिया, ड्रोन प्रात्यक्षिक, कृषि विभागाच्या विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी विविध गावामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले.
वडगाव कांदळी येथे झालेल्या कार्यक्रमात गावच्या सरपंच उल्का पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर, केंद्राचे शास्रज्ञ राहुल घाडगे, योगेश यादव, कृषी अधिकारी राणू आंबेकर, कांदा लसूण संशोधन केंद्राच्या शास्रज्ञ डॉ. कल्याणी, डॉ. सौम्या, प्रांजली गेडाम, डॉ. स्वाती सहा, प्रगतिशील शेतकरी बाळकृष्ण नीलख, संदेश पाचपुते, शब्बीर पठाण, किसन गगे, श्रीकांत पाचपुते, संतोष शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी मृदा परीक्षण महत्व, नमुना घ्यावयाची पद्धती, बीज प्रक्रिया या विषयी माहिती दिली. कृषी अधिकारी आंबेकर यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. डॉ. कल्याणी यांनी कांदा साठवणिकी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल घाडगे यांनी केले तर सूत्रसंचालन उपसरपंच संजय खेडकर यांनी केले.