“कुलस्वामी”ने तिघांचे सभासदत्व केले रद्द.

WhatsApp

नारायणगाव पुढारी वृत्तसेवा

 श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या हिताला बाधा आणणाऱ्या संस्थेच्या तीन सभासदांचे सभासदत्व संस्थेने विशेष सभा घेऊन रद्द केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी सांगितले.

   नारायण निवृत्ती शिंदे,तानाजी रामभाऊ शिंदे व अशोक किसन चव्हाण या तिघांचे सभासदत्व संस्थेने दिनांक 26 रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या विशेष सभेमध्ये रद्द करण्यात आले. दरम्यान संस्थेने आमच्यावर आकसाने कारवाई केली असून आम्ही या निर्णयाच्या विरोधात संबंधित विभागाकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

    महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 च्या कलम 35 आणि अंतर्गत नियम 28, 29 अंतर्गत शेअर जप्ती सह सदस्यत्वातून हकालपट्टीची सूचना अशा आशयाचे नोटीस या तिघांना संस्थेने 10 मार्च 2025 रोजी बजावली होती. त्यांच्यावर संस्थेच्या हिताला बाधा आणण्याचा आरोप ठेवण्यात आला होता या विशेष वार्षिक सभेत या तिघांचे म्हणणे मांडण्याची मुभाही दिली होती.

   संस्थेची 25 ऑगस्ट 2024 रोजी 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या बैठकीमध्ये विषय क्रमांक 17 नुसार चर्चेनंतर वार्षिक सर्वसाधारण सभेने या तिघांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 च्या कलम 35 नुसार सोसायटीच्या सदस्य पदावरून काढून टाकण्याची कारवाई सुरू करावी आणि शेअर जप्त करावेत दिनांक 22 जुलै 2024 रोजी झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीतही हा ठराव मंजूर झाला झाला होता.

    संस्थेचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे म्हणाले की, संस्थेने बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ह्या तिघांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव संमत झाला असून हा ठराव संबंधित खात्याला पाठवून त्यांची मंजुरी आल्यानंतर यांचे सभासदत्व रद्द होईल. संस्थेच्या कारभार पारदर्शक असल्याने महाराष्ट्र मधून संस्थेकडे ठेवीचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. चांगल्या चाललेल्या संस्थेला हे लोक नाहक बदनाम करीत आहेत. सभासदांनी काही विधायक सूचना जरूर कराव्यात परंतु संस्थेच्या हिताला कोणीही बाधा आणू नये असे आवाहन पिंगळे यांनी केले.

     दरम्यान या संदर्भामध्ये अशोक किसन चव्हाण म्हणाले की, संस्थेने बोलावलेल्या विशेष सभेपूर्वी आम्ही दिलेला खुलासा संस्थेने मान्य केला नाही .संस्थेत चाललेल्या चुकीच्या कारभारावर आम्ही आवाज उठवला म्हणजे संस्थेच्या हिताला बाधा आणली असे होत नाही. विद्यमान संचालक मंडळांनी आवाजी मतदानाने या विशेष सभेमध्ये आम्हा तिघांचे सभासदत्व रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो आम्हाला मान्य नसून आम्ही राज्याच्या सहकार आयुक्तांकडे या निर्णयाचे विरोधात दाद मागणार आहोत. आम्ही तिघेही संस्थेचे हितचिंतक सभासद आहोत. आम्हाला खात्री आहे सहकार आयुक्त यांच्याकडून न्याय मिळेल.

जाहिरात

error: Content is protected !!