कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातील पाण्याचा विसर्ग तातडीने पाणी बंद करण्याची मागणी.

WhatsApp


नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातून पूर्व भागातील पारनेर, कर्जत, करमाळा व श्रीगोंदा या तालुक्यांसाठी सुरू असलेल्या पाणी आवर्तनावरून शेतकरी वर्गात नाराजी वाढताना दिसत आहे. ५ मार्च २०२६ रोजी सुरू करण्यात आलेल्या या आवर्तनाला ३५ दिवसांचा कालावधी असून सध्या १४५० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सुमारे चार टीएमसी पाणी शेती व पिण्यासाठी पूर्व भागात सोडण्यात आले आहे. दरम्यान, निघोज येथील यात्रेमुळे हे पाणी काही काळ सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पाणी बंद कधी करण्यात येणार याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. सध्या येडगाव धरणाचा डावा कालवा दुथडी भरून वाहत असून पारनेर, कर्जत, करमाळा व श्रीगोंदा या तालुक्यांपर्यंत सुमारे अडीचशे किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचत आहे. मात्र, वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने स्थानिक शेतकरी वर्गाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यंदाचा उन्हाळा खूपच कडक असून जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला व पिण्यासाठी पाण्याची गरज असून उर्वरित पाणी शिल्लक ठेवावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा इशारा : “कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा केवळ २५ टक्क्यांवर आला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवणे योग्य नाही. जलसंपदा विभागाने तात्काळ पाणी बंद करावे, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू ढोमसे यांनी दिला. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेषतः चिंता वाढली असून, सध्याच्या पाणी विसर्गामुळे आगामी काळात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. जलसंपदा विभागाचे नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

जाहिरात

error: Content is protected !!