जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस. शेतात पाण्याची तळी.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील खोडद हिवरे परिसरामध्ये रविवार (दि15) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला . या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सगळीकडे शेतामध्ये पाण्याची तळी तयार झाली आहेत. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे. दिवसभर मोठ्या प्रमाणात असाह्य ऊकाडा होत असतो. सायंकाळी पाचच्या नंतर जोरदार पाऊस येत असतो.रविवारी दुपारी पाच नंतर खोडद, हिवरे, निमगाव सावा,पारगाव, साकोरी पिंपरी कावळ या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेत जमिनीत पाण्याची तळी साठली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटले. अनेक ठिकाणी शेतातील माती देखील वाहून गेली. सगळीकडेच पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. ओढे, नाले हे सुद्धा भरून वाहत होते. सध्या उन्हाळी भुईमूग काढण्याचा हंगाम सुरू असून या पावसामुळे भुईमूग काढण्याच्या कामाला व्यत्यय आला आहे. तसेच या पावसामुळे फुल शेती सुद्धा धोक्यात आली आहे. टोमॅटो पिकावर सुद्धा या पावसाचा विपरीत परिणाम होत असून टोमॅटोच्या फळावर काळे डाग आल्याने तोडणी आलेली टोमॅटो अधिक फेकून द्यावी लागत आहेत. तसेच फ्लॉवर, कोबी या पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मे महिन्यात पडलेल्या पावसाने ही दोन्ही पिके सडून गेली आहे. थोड्याफार प्रमाणात शिल्लक असलेली पिके आजच्या पावसाची शेतात पाण्याची तळी झाल्याने ही पिके पूर्णपणे वाया जाणार आहेत. इतर तरकारी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. वांगी, दोडका, चवळी, गाजर,मका या पिकांचे देखील पावसाने मोठे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मेथी व कोथिंबिरीचे बाजार भाव चांगले वाढले असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे मिळत होते. परंतु आज झालेल्या मोठ्या पावसामुळे ही दोन्ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

जाहिरात

error: Content is protected !!