नारायणगाव : ( प्रतिनिधी)
जुन्नर तालुक्यातील सावरगावच्या काचळवाडी येथे गुरुवारी (दि. 5) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पकडण्यास वनविभागाला यश आले आहे. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. दरम्यान या परिसरामध्ये दोन बिबटे अद्यापही फिरत असून त्या बिबट्यांना पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी माउली काचळे यांनी केली आहे.
काचळवाडी परिसरामध्ये बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे केली होती. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन व शेतकऱ्यांची भेट घेऊन परिसरात बिबट्या कुठे फिरतोय त्याच्या पावलांचे ठसे पाहिल्यानंतर तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अडकला.
दरम्यान परिसरामध्ये अद्यापही दोन बिबटे फिरत असून या बिबट्यांना तातडीने पकडण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थ माऊली काचळे यांनी केली आहे. तसेच हा पकडलेला बिबट्या इतरत्र कुठेही सोडून न देता माणिकडोह निवारा केंद्र येथेच ठेवण्यात यावा किंवा गुजरात राज्यातील वनतारा येथे पाठवण्यात यावा. अशी मागणी केली आहे.