नारायणगाव : (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे आदेश न्यायालयाने दिल्याने सर्वच पक्षाचे नेते तयारीला लागले आहेत. यामध्ये जुन्नर तालुका आघाडीवर आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी याबाबतची हालचाल सुरू केली असून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. धर्मेंद्र राज्यात महायुतीचे सरकार असलं तरी याच महायुतीच्या घटक पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जुन्नर नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा माजी आमदार अतुल बेनके यांचे निवासस्थानी मागील आठवड्यात झाला. पक्ष बांधणी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आढाखे कार्यकर्त्यांचे मनोगत यावेळी स्थानिक नेत्यांनी जाणून घेतले. या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढायला नको. स्वतंत्रपणे लढल्यास संघटना मजबूत होऊन निवडणुकीत पक्षाला यश येईल. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा ओझर या ठिकाणी पार पडला. या बैठकीत देखील संघटनात्मक चर्चा होऊन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व जुन्नर नगरपरिषद या निवडणुकी संदर्भात देखील कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्यात आला. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांना सांगून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी कार्यकर्त्यांना सांगितले असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक(दि.9) आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये संघटना बांधण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असल्याचे सचिन वाळुंज यांनी सांगितले. या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व जुन्नर नगर परिषद निवडणुकी संदर्भात देखील कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्यात आला. आमदार शरद सोनवणे हे विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढून निवडून आल्यावर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद जुन्नर तालुक्यामध्ये म्हणावी एवढी मजबूत नाही. त्यामुळे या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फार कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराम लांडे या पक्षात गेल्यामुळे पाडळी तांबे गटात अथवा गटाचे नाव बदलल्यास त्या गटात देवराम लांडे अथवा त्यांच्या सुनेला उमेदवारी द्यावी लागणार आहे. लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सुनिता बोऱ्हाडे यांनी जोरदार तयारी केली आहे. हा गट महिलेसाठी राखीव झाल्यास देवराम लांडे यांची सून मायी लांडे अथवा सुनीता बोराडे यापैकी एकीला उमेदवारी मिळू शकते. दरम्यान जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागा राहणार असल्याची चर्चा होत असून सहा जागेवर महिलांचे आरक्षण असणार आहे अवघ्या दोन जागाच पुरुषांसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी महिलाराज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना जुन्नर तालुक्यासाठी महिला उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत पंधरा दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यात येऊन गेले. त्यांनी नारायणगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांशी विचार विनिमय केला. महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या की पक्ष म्हणून वेगळी निवडणूक लढवायची याबाबत महाविकास आघाडीत कोणताही निर्णय झालेला नाही. तथापि शिवसैनिकांनो कामाला लागा असा आदेश खासदार राऊत यांनी शिवसैनिकांना दिला आहे. 2019 ला शिवनेरीवर भगवा फडकला हवा असे अपेक्षा देखील यावेळी मेळाव्यात बोलताना व्यक्त केली. जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद नगण्य आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान विघ्नहर चे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे जुन्नर तालुक्यात काँग्रेस पक्ष हा नावापुरता शिल्लक आहे त्यामुळे या पक्षात सध्या सन्नाटा पाहायला मिळत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील मोठी मरगळ असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात कोणत्याही हालचाली स्थानिक स्तरावर दिसत नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार असल्याच्या वावड्यांमुळे कार्यकर्ते द्विधा मनस्थिती मध्ये आहेत. या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होण्याची प्रबळ इच्छा आहे.