विद्यार्थ्यांनी सर्व गुणसंपन्न होण्यासाठी व तांत्रिक कौशल्य आत्मसात करावे – जितेंद्र गुंजाळ

WhatsApp


नारायणगांव (प्रतिनिधी ) अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश केल्यावर सर्व प्रकारे तांत्रिक कौशल्य आत्मसात करून त्यामध्ये निपुणता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहीजे. तसेच सैध्दांतिक व प्रात्यक्षिक यांचा समतोल साधून आपल्या क्षेत्रातील सखोल अभ्यास करून ध्येय्य गाठले पाहिजे, असे मत जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक, क्रिडा यासारख्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून विद्यार्थ्यांना त्या सुविधांचा निश्चितपणे लाभ घेतला पाहीजे असे आवाहन केले. तसेच महाविद्यालयामध्ये विविध क्लब स्थापन केलेले असून त्यामध्ये आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे असेही सांगितले. जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरण महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी इंडक्शन व मार्गदर्शन कार्यक्रम २०२५-२६ आयोजित करण्यात आला होता यानिमित्ताने ते बोलत होते.
यावेळी संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ यांनीही विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आपले लक्ष्य निश्चित करण्याचे आवाहन केले – शासकीय नोकरी, प्लेसमेंट किंवा उद्योजकता कोणतेही ध्येय असो. सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्य विकास करावा. सांस्कृतिक, क्रीडा, रोबोटिक्स व स्पोर्ट अॅकक्टिव्हिटी यामध्ये सहभागी होऊन नोकरी व शिक्षण यातील गॅप प्रात्यक्षिक प्रशिक्षणाद्वारे पूर्ण करावा, असे त्यांनी सांगितले. पालकांनी पालक-शिक्षक सभांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवावे तसेच विद्यार्थ्यांनी आरोग्य व तंदुरुस्तीची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच नुकतेच आपल्या महाविद्यालयात अल्ट्राटेक या कंपनीच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आल्याची माहितीदेखील दिली.
याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दत्तात्रय गल्हे, प्राचार्य डॉ. दामोदर गरकल यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रथम वर्ष समन्वयक प्रा. वाल्मिक घोलप यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. प्रवेश समन्वयक व समुपदेशक प्रा. राजकुमार मानकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. खंडू सैद यांनी विद्यार्थ्यांना कंपनीमधील नियुक्ती व प्लेसमेंट याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचा समारोप करताना प्रा. प्रेरणा भुतडा यांनी “विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” असे त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने सांगितले. यावेळी प्रथम वर्ष विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!