दहावीनंतरचा डिप्लोमा अभ्यासक्रम रोजगार मिळवून देणारा उत्तम पर्याय.

WhatsApp


नारायणगाव :(प्रतिनिधी)आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई तसेच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त तंत्रनिकेतन संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनादहावीनंतर पदविका अभ्यासक्रमांच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेता येतो. तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल, सिव्हील, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, मेकॅट्रॉनिक्स अशा विविध विद्याशाखा कार्यरत आहे. या सर्व शाखांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत राबविला जातो. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत नॉन-कॅप कोट्यामधून / संस्थास्तरावर प्रवेशित झालेल्या व 70% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. MSBTE मार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट हा कार्यक्रम राबवला जातो. त्या अंतर्गत तंत्रनिकेतनमधील अधिव्याख्यात्यांकडून पदविका अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचार, प्रसार व मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ( MSBTE New Syllabus ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नवा अभ्यासक्रम आणला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची हमी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचं नाव ‘K Scheme’ असं आहे.
MSBTE (महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ) ची K योजना ही तंत्रशिक्षण (Technical Education) क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये:
या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
नवीन अभ्यासक्रम:
K योजनेत नवीन अभ्यासक्रमांचा समावेश केला जातो, ज्यामुळे विद्यार्थी नवीनतम तंत्रज्ञानाशी परिचित होतात.
उद्योग-आधारित शिक्षण:
विद्यार्थ्यांना उद्योग-आधारित शिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यास मदत होते.
नोकरी संधी:
या योजनेतील विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी मिळतात, कारण ते उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये मिळवतात.
उच्च शिक्षण:
K योजनेतील विद्यार्थी उच्च शिक्षण (Higher Education) देखील घेऊ शकतात.
विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रानंतर बारा आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची उद्योग जगताशी ओळख होते. नवीन अभ्यासक्रम हा NBA मानांकनानुसार Outcome Based शिक्षण प्रणालीवर आधारित आहे.प्रत्येक शाखेनुसार तिसऱ्या वर्षाला विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे वैकल्पिक विषय निवडता येतात. “K” Scheme मध्ये कौशल्य विकास, प्रात्यक्षिके व निरंतर मूल्यमापनावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विषयांचे आकलन सोप्या पद्धतीने होण्यासाठी द्विभाषिकतेचा पर्याय (इंग्रजी व मराठी) अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.विद्यार्थी मराठी भाषेतून देखील परीक्षा देऊ शकतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून MSBTE मार्फत विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये पेपर सादरीकरण स्पर्धा, प्रकल्प प्रदर्शन स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी..
पदविका अभ्याक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत राबवली जाते पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता निकष दहावी परीक्षा किमान 35% गुणांसह उत्तीर्ण अशी आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष HSC Science With Mathematics, किंवा दोन वर्षाचा ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.पदविका अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून आर्थिक सहायता/ शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.
इतर मागासवर्ग,अनुसूचित जाती /जमाती आणि भटक्या विमुक्त जाती / जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना राबवली जाते . अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती दिली जाते.CAP मार्फत प्रवेशित महाराष्ट्र राज्याचे अधिवासी व वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाख पर्यन्त असणाऱ्या विद्यार्थीनींकरिता “शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना” लागू केली असून आकारण्यात येणारे 100% शिक्षण शुल्क माफ करण्यात येत आहे.
राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया मंगळवार २० मेपासून सुरू झाली असून तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासह कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीसाठीची प्रक्रिया 20 मे ते 16 जूनपर्यंत स्वतः मोबाईल तसेच संगणकावर किंवा नजीकच्या प्रवेश प्रक्रिया केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी E-Scrutiny हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे..

जाहिरात

error: Content is protected !!