नारायणगाव : (प्रतिनिधी) शेत जमिनीच्या सपाटी कारणावरून झालेल्या वादातून मारहाण केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय जुन्नर यांनी हिवरे तर्फे नारायणगाव येथील तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आशी शिक्षा दिली आहे.दंड न भरल्यास, आरोपींना आणखी ६ महिने साधी कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. या प्रकरणी दशरथ गणपत भोर (वय 55),अमोल उर्फे पप्पु दशरथ भोर (वय 25 ), विठ्ठल गणपत भोर( वय 50,सर्व रा.हिवरे तर्फे नारायणगाव ता. जुन्नर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी विश्वास शंकर भोर यांच्या गट नंबर 426/1 मधील शेत जमिनीचे सपाटीकरण 06 मे 2011 रोजी सुरू होते. जमिनीच्या सपाटी कारणावरून तीन आरोपींनी विश्वास शंकर भोर व त्यांचा मुलगा यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी विश्वास भोर यांच्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायदा कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार एन.के.मोहरे यांनी करून आरोपी दशरथ भोर, विठ्ठल भोर, अमोल भोर (सर्व राहणार मांजरवाडी ) यांच्या विरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते.भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २४८(२) नुसार आरोपींना जुन्नर न्यायालयाने दोषी ठरवून प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून एम. एस. घोडके यांनी काम पाहिले.गुन्ह्याचे कोर्टाचे कामकाज सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार , महिला पोलीस शिपाई ललिता किर्वे यांनी पाहिले. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक शशिकांत खरात,महिला पोलीस हवालदार एम.एम ताम्हाणे यांनी काम पाहिले.