वनमंत्री गणेश नाईक बुधवारी जुन्नरच्या दौऱ्यावर.


नारायणगाव : (प्रतिनिधी)  राज्याचे वनमंत्री गणेश नाईक बुधवारी(दि. 11) रोजी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर ते बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या तिघांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.   बेल्हे ( ता. जुन्नर ) येथे हौसाबाई विचारे यांच्या दशक्रियेला ते येणार असून त्यानंतर ते जांबुत व पिपंरखेड येथे बिबट्याने ठार केलेल्या भागुबाई जाधव, शिवण्या बोंबे व रोहन बोंबे यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.   दरम्यान जुन्नर, शिरूर व आंबेगाव तालुक्यात उच्छाद मांडला असून या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. तसेच वन खात्याला जर या बिबट्यांची व्यवस्था करता येत नसेल तर त्यांना गोळ्या घालण्याची परवानगी देण्यात यावी अशी देखील मागणी स्थानिक शेतकरी वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे करणार आहेत.  तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जनावरांची भरपाई जास्त रकमेत मिळावी तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास पंचवीस लाखाची ऐवजी एक कोटी रुपयांची मदत त्या कुटुंबाला दिली जावी अशी देखील मागणी यावेळी शेतकरी वनमंत्र्यांकडे करणार आहेत.    दरम्यान भागुबाई जाधव शिवन्या बोंबे  व रोहन बोंबे यांच्या निवासस्थानी गेल्यावर बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे या संदर्भात नेमकी काय मागणी करणार? याबाबतची देखील उत्सुकता आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहनचे वडील विलास बोंबे व शिवन्याचे आई-वडील बिबट्यावर कायमस्वरूपी उपायोजना करण्यासंदर्भात काय मागणी करतात? याबाबतची उत्सुकता वाढली आहे.    रोहन बोंबे यांच्या कुटुंबीयांच्या घराकडे जाण्यासाठी गेले अनेक वर्ष रस्ता नसल्यामुळे  शाळकरी मुले तसेच वयोवृद्ध व्यक्ती यांना आपल्या पाहुण्यांकडे ठेवावे लागत आहे. या संदर्भात वनमंत्री नेमकी काय भूमिका घेतात तसेच यापुढे बिबट्याच्या हल्ल्यात त्या परिसरामध्ये एकचही मृत्यू होऊ देणार नाही असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दिला आहे. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही उपाययोजना सांगतात याबाबत देखील सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

जाहिरात

error: Content is protected !!