नारायणगाव : ( प्रतिनिधी) येडगाव धरणांमधून माती उपसण्यासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची अनुमती नसतानाही बेकायदेशीरपणे चोरून लपून मातीचा उपसा होऊ लागला आहे. दरम्यान या संदर्भामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला विचारणा केली असता ते म्हणाले की, माती उपसा करण्यास शासनाची परवानगी अद्याप दिलेली नाही. कैलासनगर हद्दीमध्ये माती काढण्याचं काम सुरू असल्याचं समजल्यावर आम्ही ते तात्काळ बंद केले आहे असे सांगण्यात आले.
सध्या येडगाव धरणामध्ये पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे धरणाच्या दोन्ही बाजूंनी माती अथवा मुरूम काढणे सहज शक्य होत आहे. सुट्टीचा दिवस व रात्रीचे वेळ पाहून काही अज्ञात मंडळी येडगाव धरणामधून चोरट्या पद्धतीने माती व मुरमाचा उपसा करीत आहेत. अशा पद्धतीने माती व मुरुमाची चोरी होत असल्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. दरम्यान धरणामधील माती शेतकऱ्यांना काढण्यासाठी शासनाने रीतसर परवानगी द्यायला हवी की, जेणेकरून अशा प्रकारची चोरी होणार नाही. याबाबत जलसंपदा विभाग योग्य प्रकारे काळजी घेईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी धरणातील माती काढून स्वतःच्या जमिनीमध्ये टाकण्यास काहीच हरकत नाही त्यासाठी शासनाने अनुमती द्यायला हवी. असा सूर स्थानिक शेतकऱ्यांचा आहे परंतु काही एजंट मंडळी शेतकऱ्याच्या नावाखाली या माती मुरूम विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. दरम्यान याबाबत जलसंपदा विभागाच्या नारायणगावचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, येडगाव धरणापासून माती अथवा मुरूम काढण्याची कोणालाही अनुमती दिलेली नाही.
ज्यांनी कोणी माती काढली असेल त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल. कैलासनगर या ठिकाणी माती काढण्याचे काम सुरू असल्याचे समजल्यावर आमच्या कोकणे नावाच्या शाखा अभियंत्याने त्या ठिकाणी जाऊन माती काढणे बंद केले आहे. इंदिरानगर येथील स्मशानभूमीच्या समोर धरण क्षेत्रातून माती व मुरुम काढला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या ठिकाणचा पंचनामा करून योग्य ती कारवाई केली जाईल.
धरण क्षेत्रामधून मुरूम अथवा माती चोरी होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाईल. धरण क्षेत्रामधून कोणीही अशा प्रकारे मुरूम अथवा मातीचा उपसा करू नये तसे आढळल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा कडूसकर यांनी दिला आहे.
