कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा घटतोय; गाळ काढण्याची मागणीने पुन्हा जोर धरला.


नारायणगाव : यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने कुकडी प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ काढण्याची मागणी पुन्हा एकदा स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. दरवर्षी या विषयावर चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने गाळ काढण्याचे काम रखडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. कुकडी प्रकल्पातील डिंभा, वडज, माणिकडोह व येडगाव या धरणांमध्ये वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचत चालला आहे. त्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता कमी होत असून भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर वेळेत गाळ काढण्याचे काम हाती घेतले, तर धरणांची साठवण क्षमता वाढण्यास मोठी मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, धरणातील गाळ काढण्यास अधिकृत परवानगी दिल्यास त्याचा दुहेरी फायदा होऊ शकतो. एकीकडे धरणातील साठवण क्षमता वाढेल, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सुपीक माती उपलब्ध होऊन शेतीसाठी उपयोग होऊ शकतो. मात्र सध्या अधिकृत परवानगी नसल्याने काही ठिकाणी मातीची चोरी होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. यामुळे शासनाचा महसूलही बुडत असून नियोजनबद्ध पद्धतीने गाळ काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रतिक्रिया – दयानंद काशीद (शेतकरी) : “धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. शासनाने परवानगी दिली तर ही माती शेतात टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढेल.” नंदकुमार हांडे (स्थानिक नागरिक) : “दरवर्षी गाळ काढण्याची चर्चा होते; मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घ्यावा.” तानाजी गावडे (शेतकरी) : “अधिकृत परवानगी नसल्यामुळे काही ठिकाणी मातीची चोरी होते. शासनाने नियोजनबद्ध पद्धतीने गाळ काढण्यास परवानगी दिली तर सर्वांनाच फायदा होईल.” दरम्यान, कुकडी प्रकल्पातील धरणांमधील गाळ काढण्यासाठी शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. जुन्नर चे आमदार शरद सोनवणे दरवर्षी याबाबतची मागणी करत असतात परंतु शासनाकडून याबाबतचा सकारात्मक निर्णय होत नसल्याची खंत देखील शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!