नारायणगाव : (प्रतिनिधी)
जुन्नर तालुक्याच्या कोकणाची चिंचोली येथील संभाजीनगरच्या सीताबाई बबन जाधव या 65 वर्षाच्या महिलेचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने झाल्याचा अक्षेप स्थानिक नागरिकांचा असल्याने वन खात्याने तातडीने बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे.
वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण म्हणाले की, या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आद्याप स्पष्ट झाले नसले तरी वन्य प्राण्याने या महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांची असल्याने बिबट्याचा व इतर वन्य प्राण्यांचा शोध घेण्यासाठी 25 वन कर्मचारी व माणिकडोह येथील बिबट रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. तसेच चार पिंजरे या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी लावले असून थर्मल ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून बिबट्याचा व वन्य प्राण्यांचा शोध घेतला जात आहे.
चव्हाण म्हणाले की, मागील आठवड्यामध्ये या परिसरामध्ये पाळीव शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आल्यावर पंचनामा करून त्यांना नुकसानीची भरपाई देखील लवकर दिली जाणार आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागामध्ये चार पिंजरे देखील लावण्यात आले आहेत स्थानिक नागरिकांनी सायंकाळच्यावेळी एकट्याने घराबाहेर पडू नये विद्युत पंप सुरू करण्यासाठी शेतात जायचे असेल हातामध्ये काठी घ्यावी त्याला घुंगरू बांधावे अथवा मोबाईल ला गाणी लावून प्रवास करावा जेणेकरून आवाजाने बिबट्या पळून जाईल.