भविष्यकाळात धरणांची उंची वाढवण्याच्या सरकारचा विचार – राधाकृष्ण विखे पाटील

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी)
चिल्हेवाडी धरणाच्या उर्वरित बंद पाईपलाईन साठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून डिसेंबर पर्यंत उर्वरित काम पूर्ण करा अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चिल्हेवाडी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद लाईनद्वारे आणलेल्या पाण्याचे जलपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदार शरद सोनवणे यांचा या जल पूजनाचा आग्रह होता.
चिल्हेवाडी धरणाच्या या कामाला 96 97 मध्ये सुरुवात झाली. हे काम लवकर पूर्ण व्हायला हवे होते. राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की,ते वेळेत पूर्ण झाले नाहीत नळवंडे धरण 18 कोटीत होणार होते परंतु वेळत पूर्ण न झाल्याने 6000 कोटी अंतिम कामाला लागले. तीन पिढ्या खपल्या तेव्हा हे काम पूर्ण झालं. यापुढे हे टाळायला हवं अशी खंत विखे यांनी व्यक्त केली. खराब झालेले कालवे दुरुस्त करायला शासन पैसे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.कालवे खराब झाल्यामुळे व त्याची गळती वाढल्यामुळे पूर्व भागात पाणीच पोहोचत नाही. पाणी सगळं वरच्या भागातच वापरलं जातं. धरणांच्या कालवे व चाऱ्या दुरुस्त करण्यासाठी 7000 कोटींचा खर्च आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये कालवे व चाऱ्या या आपण दुरुस्त करणार आहोत. पिंपळगाव जोगेच्या देखील वितरिका भविष्यकाळामध्ये आपल्याला बंद पाईपलाईन द्वारे कराव्या लागतील. चाऱ्यामधून पाणी देऊ लागलो तर पाणी कोणालाच मिळणार नाही. भविष्य काळामध्ये बंद नलिकेतून पाणी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे तीस ते पस्तीस टक्के पाण्याची बचत होते. त्यामुळे अधिक क्षेत्राला पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. बंद पाईप मधून पाणी नेण्याचा प्रयोग दोन तीन ठिकाणी करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे विखे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी याला संमती दिली तर भविष्यकाळामध्ये सगळीकडेच असा प्रयोग करता येईल. कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.पीडीएन योजना राबवण्याची आपल्याकडे आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.ही योजना सगळ्यात जुन्या धरणांना घेण्याचा आपण निर्णय घेतला असल्याचे विखे यांनी सांगितले. कालव्याचे अस्तरीकरण उखडल्यामुळे पिंपळगाव जोगेच पाणी पारनेरला कधी पोहोचतच नाही अशी खंत विखे यांनी व्यक्त केली. पारनेरच्या लोकांना किती दिवस दुष्काळग्रस्त ठेवायचं?असा सवालही यावेळी त्यांनी व्यक्त केला. पिंपळगाव जोगा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम तातडीने हाती घेणार असल्याचेही यावेळी विखे यांनी सांगितले. वर्षभरात हे काम पूर्ण केले जाईल यासाठी 94 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. चिल्हेवाडी धरणाच्या बंद पाईपलाईनला 50 कोटी रुपये लागणार आहेत ते सुद्धा मी दिले आहेत. ते काम डिसेंबर 25 पर्यंत पूर्ण करा अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे विखे यांनी सांगितले. माणिकडोह धरणावर पूर्व भागातील तालुके अवलंबून आहेत. बोगद्याचा प्रश्न देखील प्रलंबित असल्याचे यावेळी विखे यांनी सांगितले. त्यावर सुद्धा मार्ग काढण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आणे पठारावर सुद्धा पाणी मिळायला हवं असेही विखे यांनी सांगितले. आता पाण्याच्या निर्मितीच्या मर्यादा आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. धरणांमधील गाळ काढता येईल का?धरणांची उंची वाढवता येईल का यावर सुद्धा भविष्यकाळात विचार करण्याची आवश्यकता आहे. कोकणातील 65 टीएमसी पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणणार असल्याचे विखे यांनी सांगितले. येडगाव धरणाजवळ ओझर येथे नौका नयन प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊ असेही यावेळी विखे यांनी सांगितले.आदिवासी भागातील बुडीत बंधाऱ्यांना देखील सरकारने मान्यता दिल्याचे विखे यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!