दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये गाळप होणा-या ऊसास पहिली उचल रु. ३६००/- प्रती मे. टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ मधील सरासरी साखर उता-यानुसार एफ.आर.पी दर रु. ३२७३.६५ प्रती मे. टन येत आहे. तथापी गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातून गाळप होणा-या ऊसासाठी पहिली उचल रु. ३६००/- प्रती मे. टन, नगर जिल्ह्यामधून पुरवठा होणा-या ऊसासाठी रु. ३२७४/- प्रती मे. टन व पैठण, गेवराई परिसरातून पुरवठा होणा-या ऊसासाठी रु. ३१००/- प्रती मे. टन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये दि.२१ नोव्हेंबर अखेर २ लाख ७२ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले असून २ लाख ८१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेवून सरासरी साखर उतारा १०.५३ टक्के मिळाला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पापासून १ कोटी ७६ लाख ५६ हजार युनिट वीज उत्पादन केले असून कारखाना वापर वजा जाता ९० लाख १३ हजार युनिट वीज निर्यात केली आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पापासून रेक्टीफाईड स्पिरीटचे ३० लाख ५० हजार बल्क लिटर उत्पादन झाले आहे. कारखान्याने गाळपाचे योग्य नियोजन केले असल्याने ऊस उत्पादकांचे संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.