बिबट समस्या हाताळण्यात यश ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब-अमोल सातपुते

WhatsApp

नारायणगाव :
जुन्नर वनविभागात काम करत असताना पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, निसर्ग अभ्यासक, जीवशास्त्र अभ्यासक, वनस्पती अभ्यासक, पत्रकार मित्र, वनविभागातील सर्वच पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्यातून आणि त्यांनी दिलेल्या विशेष योगदानातून उपवनसंरक्षक या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकलो आणि यातूनच बिबट समस्या हाताळण्यात यश आले, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.असे प्रतिपादन अमोल सातपुते यांनी केले.
जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यांसाठी उप वनसंरक्षक म्हणून काम केलेले अमोल सातपुते यांची जुन्नर येथून बदली झाली असून त्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, पत्रकार दिलीप वळसे सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, सहायक वन संरक्षक अजित शिंदे, वनक्षेत्रपाल संतोष कंक लहू ठोकळ कुणाल लिमकर विकास भोसले यादव जाधव निळकंठ गव्हाणे प्रदीप चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विजय कोल्हे, संजय वऱ्हाडी, रुपेश जगताप तसेच जुन्नर आंबेगाव खेड व शिरूर या चारही तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सातपुते म्हणाले की,भारतीय वन सेवेत पदोन्नती मिळाल्यानंतर जुन्नर वन विभागात उपवनसंरक्षक पदी रुजू होताना शिवजन्मभूमीत काम करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंदी होतो.त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवनेरीवरील रखडलेली 4 वन उद्यानाची कामे विहित वेळेत पूर्ण करून त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री यांचे हस्ते करून घेता आले.
स्वच्छ, सुरक्षित व जबाबदार वन पर्यटनासाठी तयार केलेले 100 प्रशिक्षित गाईड आणि 3 तपासणी नाके हे उपक्रम प्रभावी ठरले.
किल्ले शिवनेरी हा मार्च 2024 पासून वन विभागाने संपूर्ण प्लास्टिक बंदी केलेला महाराष्ट्रातील पहिला किल्ला ठरला.
तसेच जुन्नर वन विभागामार्फत जुन्नर तालुका पर्यटन आणि देवराई या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे भाग्य लाभल्याचे सातपुते यांनी सांगितले.
राजगुरूनगर येथे राज्यातील पहिले अमृत वन आणि जुन्नर येथे शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवराय वन उद्यान विकसित केले. तसेच
अति संवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रात शीघ्र बचाव दलाचे बेस कॅम्प ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच राबविता आला.
अमोल सातपुते पुढे म्हणाले की, बिबट्या पासून बचावासाठी मेंढपाळ वर्गाला टेन्ट आणि सौर दिवे तसेच एकट्या घर गोठ्याभोवती सौर कुंपण हे उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच राबविले.अनायडरचा 75 ठिकाणी व्यापक वापर आणि AI आधारित अलर्ट यंत्रणा 6 ठिकाणी उभारून बिबट लोकवस्तीत आल्याचे संदेश देणे सुरु करता आले.
तसेच वन विभागातील कडक शिस्त, विहित काल मर्यादेत कामे पूर्ण करणे आणि सर्व कामाचा उच्च दर्जा राखणे यात कोणतीच तडजोड केली नाही. वनकर्मचाऱ्यांवरील कामाचा नेहमीचा ताण लक्षात घेऊन जानेवारी 2023 मध्ये जुन्नर वन विभागात प्रथमच विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती असे सातपुते यांनी सांगितले
पत्रकार बांधव, विविध सामाजिक व पर्यटन संस्था तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चारही तालुक्यातील सर्व आजी- माजी लोकप्रतिनिधी यांचे उत्तम सहकार्य
लाभल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
आई-वडील यांचे आशीर्वाद आणि सुविद्य पत्नी डॉ अर्चना सातपुते व कुटुंबाचे पाठबळ मिळाल्याने कर्तव्य नीट बजावता आल्याचा उल्लेख सातपुते यांनी यावेळी केला. तसेच जुन्नर विभागातील सर्व तत्कालीन आणि कार्यरत सहायक वनसंरक्षक, वन परीक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत मोलाचे योगदान दिल्यामुळे जुन्नर वन विभागात अनेक उल्लेखनीय कामे होऊ शकली, हे केवळ टीम वर्कमुळे शक्य झाले.
आपल्या कारकिर्दीत जुन्नर वन विभागाने राबविलेल्या पर्यावरण पूरक कामांमुळे शिवनेरी किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाला, हे पाहण्याचे भाग्य लाभले. असे यावेळी अमोल सातपुते यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी अंबादास हांडे, पत्रकार दिलीप वळसे,सुरेश वाणी, रवींद्र पाटे, अमृत शिंदे, अजित शिंदे आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व लक्ष्मण दातखडे यांनी केले.

जाहिरात

error: Content is protected !!