खा. डॉ.अमोल कोल्हे व सत्यशील शेरकर यांच्यात वाढतोय दुरावा

जुन्नर (प्रतिनिधी ) जुन्नर तालुक्याच्या पिंपळगाव जोगा परिसरातील पांगरी व वाटखळ परिसरामध्ये गारपिटीने चार दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. त्यांच्या समवेत पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले व इतर कार्यकर्ते होते.
मात्र त्यांच्या दौऱ्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सप्तशील शेरकर सहभागी नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सर्कस सहभागी नसल्यामुळे कोल्हे आणि शेरकर यांच्यात काही राजकीय मतभेद निर्माण झालेत का? किंवा विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे स्थानिक नेत्यांनी दगा फटका केल्यामुळे शंकर नाराज आहेत का याबाबत देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्व संधेला सत्यशील शेरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीत शेरकर यांचा पराभव झाला असला तरी दुसऱ्या क्रमांकाची त्यांना मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शेरकर फारसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. एवढेच काय १२ डिसेंबरला पवारांचा वाढदिवस साजरा झाला त्यावेळेस देखील शेरकरांनी कोणताही कार्यक्रम अटेंड केला नाही. पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्नर येथे एक आंदोलन करण्यात आले त्यावेळी देखील शेरकर त्यामध्ये सहभागी झाले नव्हते.
शेरकर यांचे हे वागणे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर होण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. तसेच त्यांचे इतर कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून काही अंतरावरच राहत असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शेरकर आपल्या कामात गर्क राहिले. पक्ष वाढीसाठी कोणताही कार्यक्रम त्यांनी हाती घेतला नाहीत. अर्थात ते ज्या काँग्रेस पक्षामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले, त्या पक्षासाठी सुद्धा फारसे सक्रिय राहिले नाहीत.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र त्यांनी आपली चुणूक दाखवून कारखान्याची सत्ता एक हाती आणली. व आपल्या वर्चस्वाची चुणूक त्यांनी दाखवून दिली. या निवडणुकीत तालुक्यातील काही राजकारणी मंडळींनी शेरकर यांना कोलदांडा घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेरकर यांना कोललदांडा घालू पाहणारेच सपशेल आपटले. काही मंडळींनी उमेदवार उभे करून आपण शेरकर यांना शह देऊ शकतो असाही प्रयत्न केला. परंतु त्यांनी देखील आपल्या सर्व उमेदवारांची माघारी घेतली. शेतकरी संघटनेने देखील शेरकर यांना पाठिंबा दिला.
अतुल बेनके यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विघ्नहरची निवडणूक आपण लढवणारच अशी भीष्मप्रतिज्ञ केली होती परंतु नंतर मात्र या निवडणुकीपासून दूर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अर्थात त्यांच्या निर्णयाची कारणे वेगवेगळी होती. विघ्नहरच्या सभासदांचा कल सत्यशील शेरकर यांच्या बाजूनी आहे आपली या निवडणुकीत डाळ शिजणार नाही हे समजल्यावर त्यांनी आपला या निवडणुकीतून काढता पाय घेतला असावा अशीही चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्यशील शेरकर यांनी मुंबई येथे जाऊन अजित पवारांची भेट घेतली होती. कदाचित त्या भेटीमध्ये शेरकर आणि पवार यांचे काही ठरले असावे. म्हणूनच अजित पवार यांच्या जुन्नरच्या या युवा नेत्याने विघ्नहरच्या निवडणुकीतून माघार घेतली असावी, असे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत कोल्हे व त्यांच्या समर्थकांनी शरद सोनवणे यांना मदत केल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच कारखान्याच्या निवडणुकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी शेरकर यांना कुठे मदत केल्याचे जाहीर ऐकिवात नाही. विधानसभा निवडणुकीत सत्यशील शेरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोनवणे यांच्या निवासस्थानी खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेली भेट अनेकांना आवडलेली नव्हती. या निवडणुकीत कोल्हे यांनी सोनवणे यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचे कारणही तसेच होते. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद सोनवणे यांनी शिवाजी आढळराव यांच्या ऐवजी अमोल कोल्हे यांनाच साथ दिली असेही बोलले जात होते.

कोल्हे व शेरकर यांची सोनवणे यांच्या निवासस्थानी नेमकी काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी. “सोनवणे तुम्ही शेरकर यांना पाठिंबा द्या तुम्हाला विधान परिषदेमध्ये घेतो” अशी ह्या दोघात चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शेरकर यांच्या भूमिकेत झालेला बदल पाहता आपण शरद पवार यांच्या पक्षात जाऊन चूक केली असे तर त्यांना वाटत नसावे ना? अशा प्रकारची शंका कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.
या सगळ्या कारणामुळे सत्यशील शेरकर व खासदार अमोल कोल्हे यांच्यात दरी तर निर्माण झाली नाही ना? अशा प्रकारची शंका निर्माण होत आहे. या दोघांच्या दुराव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
वादळी पावसाने व गारपिटीने मढ परिसरात झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात सत्यशील शेरकर सहभागी नसल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.या बाबत या पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात यांना विचारले असता, ते म्हणाले की,शेरकर यांच्याशी आम्ही संपर्क केला होता परंतु ते बाहेरगावी असल्याने ते म्हणाले मी नंतर एकटा जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करेल. याबाबत शेरकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, दौऱ्याबाबत मला काहीच कोणी कल्पना दिली नाही. त्यामुळे या दोन्ही वक्तव्याचा अर्थ आता वेगळा काढण्याची गरज नाही. शेरकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावले जात आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे.

अर्थात शेरकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावण्याची कारणे वेगवेगळे असू शकतात. शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शेरकर यांचे काम केले नाही,याबाबतचे अनेक पुरावे शेरकर यांच्या हाती लागले असल्याचे देखील चर्चा असून त्यामुळे देखील शेरकर या पक्षापासून दूर राहात असल्याचे शेरकर यांचे समर्थक खाजगीत सांगत आहेत.
एकंदरीत जुन्नर तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे, हे मात्र निश्चित.जर ही दुफळी अशीच राहिली तर येणाऱ्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका या पक्षाला निश्चित बसू शकतो. खासदार अमोल कोल्हे काही तडजोडीचे राजकारण करतील का? किंवा या पक्षाचे वरिष्ठ नेते या दोघात पुन्हा “पॅचअप” करतील का? असा सवाल व्यक्त होत असून जर वेळीच या दोघात काही समन्वय घडवून आणला नाही तर आगामी काळात या पक्षामध्ये गटबाजी अधिक उफाळून येऊ शकते.

जाहिरात

error: Content is protected !!